Wed, Apr 24, 2019 11:46होमपेज › Belgaon › लँडमाफियागिरी बेळगावमध्ये तीव्र

लँडमाफियागिरी बेळगावमध्ये तीव्र

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:18PMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणूक संपल्यानंतर बेळगावात आता लँडमाफियागिरीने डोके वर काढल्याचे स्पष्ट होते आहे. रिअल इस्टेट उद्योजक पी. डी. धोत्रे यांना जमीन  व्यवहारात भीमशी जारकीहोळींच्या समर्थकांनी धमकी दिली आहे. जमिनीच्या व्यवहारप्रकरणी भीमशी जारकीहोळी यांच्या साथीदारांकडून जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार करीत भाजप नेते धोत्रे व वीरुपाक्ष कांबळे यांनी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

धोत्रे व त्यांचे सहकारी वीरुपाक्ष यांनी हिंडलगा येथील सर्व्हे क्र. 181/7, 181/8 येथील जमिनीचा व्यवहार केला आहे. याबद्दल भीमशी जारकीहोळी यांचे समर्थक बी. जे. संगोडी व त्यांच्या काही साथीदारांनी वीरुपाक्ष यांची भेट घेऊन भीमशी जारकीहोळी सावकारांनी सदर जनिमीच्या व्यवहारासंदर्भात बोलणी करण्यासाठी आपल्याला बोलावले आहे, असे सांगितले. सदर बाब वीरुपाक्ष यांनी धोत्रे यांना कळविली. 

शुक्रवारी 15 रोजी धोत्रे दुपारी 2.20 वा. आपल्या कार्यालयात असताना भीमशी जारकीहोळी यांचे समर्थक कार्यालयात गेले आणि सावकार बोलावत आहेत, असा निरोप त्यांना दिला. जमिनीचा व्यवहार पूर्ण करायचा असून सावकारांनी चर्चेसाठी येण्यासाठी सांगितले आहे. तुम्ही सावकारकडे येऊन व्यवहार पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्हाला उचलून घेऊन जाऊ,  न आल्यास तुमची परिस्थिती वाईट होईल, अशी धमकीही देण्यात आली आहे. यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत मार्केट पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.