होमपेज › Belgaon › हेब्बाळकर - निंबाळकर रस्सीखेच : जिल्ह्यात लॉबिंग

‘मंत्रीभाग्य’ कुणाच्या पारड्यात?

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 20 2018 9:16PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकात काँग्रेस-निजद युती सरकार अस्तित्वात येत असून मुख्यमंत्रिपदी निजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी लवकरच शपथबद्ध होणार आहेत. युती सरकारमध्ये आता मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असून बेळगावातूनही याकरिता लॉबिंग होत आहे. यंदा प्रथमच बेळगाव ग्रामीण आणि खानापूर मतदारसंघातून मोठ्या अंतराने महिला निवडून आल्या आहेत. यापैकी एकीला मंत्रिपद निश्‍चित मानले जाते.

काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. सतीश जारकीहोळी, रमेश जारकीहोळी माजी मंत्री आहेत. गणेश हुक्केरी माजी संसदीय सचिव, लक्ष्मी हेब्बाळकर राज्य महिला काँग्रेस अध्यक्षा, अंजली निंबाळकर बालभवनच्या अध्यक्षा आहेत. महांतेश कौजलगी यांनी याआधी विधानसभा आणि विधान परिषद सदस्य म्हणून सेवा बजावली आहे. यामध्ये जारकीहोळी बंधूंपैकी एकास मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. महिला कोट्यामध्ये कुणाला ‘मंत्रीभाग्य’ मिळणार ते पहावे लागणार आहे.

हेब्बाळकर यांचे जिल्ह्यात वर्चस्व आहे. राज्य महिला काँग्रेस अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी शिवाय राज्यातील विविध नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. संपूर्ण राज्यात महिलांना संघटित करण्याचे काम त्या करत आहेत. निवडणुकीआधी त्यांच्याविरुद्ध प्राप्‍तीकर छापे, कुकरचे वाटप असे आरोप झाले. या विरोधात त्या एकट्याच हिमतीने लढल्या. 

अंजली निंबाळकर या वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या माध्यमातून  त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. राज्य बालभवनच्या त्या अध्यक्षा आहेत. गत निवडणुकीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढली. पण, यात त्यांना अपयश आले. गेली 66 वर्षे खानापुरात म. ए. समितीचे वर्चस्व होते.  अशा परिस्थितीत त्यांनी यंदाच्या निवडणुकीत व्यापक प्रचार करून विजय मिळविला. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे. 

दोघींपैकी एकटीला महिला व बालकल्याण खाते मिळण्याची शक्यता आहे. अर्थात एकटीलाच मंत्रिपद देण्याचे निश्‍चित झाले, तर ते हेब्बाळकरना मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण हेब्बाळकरांना डावलून निंबाळकरांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता कमी आहे. दोन महिलांना मंत्रिपदे द्यायची झाली, तर या दोघींनाही मंत्रिपद मिळू शकते. अर्थात त्यामुळे जिल्ह्याला तिसरे मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे. बुधवारपर्यंत मंत्रिमंडळाला अंतिम स्वरुप मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.