Mon, Jul 15, 2019 23:45होमपेज › Belgaon › मतदारांची संगत, हरवली लढ्यातील रंगत

मतदारांची संगत, हरवली लढ्यातील रंगत

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 9:25PMबेळगाव : प्रतिनिधी

मागील वर्षभरापासून जारकीहोळी बंधूमध्ये रंगलेल्या कलगीतुर्‍यामुळे चर्चेत असणारा यमकनमर्डी विधानसभा सध्या निरस बनलेला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर लखन जारकीहोळी यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा देणार असल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे याठिकाणी भाजपचा उमेदवार काँग्रेस उमेदवाराविरोधात एकाकी लढत देत आहे.

जारकीहोळी बंधूंमध्ये रंगलेल्या भाऊबंदकीमुळे राजकारणात हा मतदारसंघ चर्चेत आला होता. आ. सतीश जारकीहोळी यांना त्यांच्या घरातूनच आव्हान निर्माण झाले होते. लखन जारकीहोळी यांनी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला होता. यामुळे एकतर्फी असणारे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. या दोघांच्या वादात तिसरे राजकीय नेतृत्व उदयाला आले नाही. 

विधानसभा निवडणुकीत सतिश विरूद्ध लखन अशी लढत रंगेल असा होरा व्यक्त केला जात होता. मात्र सारे अंदाज फोल ठरवत लखन यांनी ऐनवेळी आपली बंडाची तलवार म्यान केली. यामुळे विरोधकांना तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही.काँग्रेसने सतीश जारकीहोळी यांना या मतदारसंघात पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेले मारुती अष्टगी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. अन्य राजकीय पक्षांचे उमेदवारदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांचा मतदारामध्ये पुरेसा प्रभाव नसल्यामुळे सतीश जारकीहोळी निर्धास्त आहेत.

मतदारसंघात कानडी-मराठी मतदारांची संख्या समान आहे. इथे ाणी म. ए. समितीचा मतदारदेखील मोठा आहे. परंतु, म. ए. समितीने उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे मराठी मते कोणाच्या पारड्यात पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या या मतदारसंघात भाजपकडून प्रचारातून रान उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हा प्रकार एकाकी सुरू असून भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे अष्टगी यांना विजयासाठी झुंज द्यावी लागत आहे. मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेस विरोधात भाजप अशीच लढत रंगणार आहे. काँग्रेसचे उमेदवार सतिश जारकीहोळी सध्या आपल्या विजयाबाबत निर्धास्त आहेत. त्यांनी आपला विजय निश्‍चित असून आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बळ्ळारी मतदारसंघात प्रचार करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रचारातील चुरस हरवली आहे.

राहू गिळणार की पावणार

सतिश जारकीहोळी यांनी  काही वर्षापासून अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. सर्व उमेदवार मुहूर्त पाहून अर्ज दाखल करताना त्यांनी पुरोगामी विचारांची जोपासना करत राहू काळात उमेदवारी अर्ज दाखल केला. राहू गिळणार की पावणार हे स्पष्ट होणार आहे.