Mon, May 20, 2019 18:58होमपेज › Belgaon › चिकोडी सरकारी हायस्कूलला इमारतीचा अभाव

चिकोडी सरकारी हायस्कूलला इमारतीचा अभाव

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 10:24PMचिकोडी : काशिनाथ सुळकुडे

प्रत्येक  मुलास शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार प्रयत्नरत असले तरी येथील सरकारी हायस्कूलची इमारत केंद्रीय विद्यालयाला दिल्यामुळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
शैक्षणिक जिल्हा हा दर्जा प्राप्त झालेल्या चिकोडी शहरात पाच वर्षापूर्वी राज्य सरकारने सरकारी हायस्कूल मंजूर केले. शहरातील आमदार आदर्श शाळेनजीकच्या आठ खोल्या शिक्षण खात्याने हायस्कूलला दिल्या. या खोल्या आता दोन वर्षापूर्वी मंजूर झालेल्या केंद्रिय विद्यालयास दिल्या आहेत. यामुळे खोल्यांअभावी वर्ग कसे घ्यायचे असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. उपाय म्हणून इंदिरा नगरातील प्राथमिक  शाळेच्या दोन खोल्यांमध्ये कन्नड विभाग व झारी गल्ली प्राथमिक शाळेच्या इमारतीत उर्दू विभाग स्थलांतरित करण्यात आला आहे. 

मूलभूत सोयींचा अभाव 

इंदिरा नगरातील सरकारी प्राथमिक शाळेच्या तीन खोल्या हायस्कूलला देण्यात आल्या असून एक कार्यालयासाठी  व केवळ दोन खोल्यांमध्ये इयता 8 वी ते 10 वी पर्यंतच्या सुमारे 200 विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. त्यामुळेच चांगली इमारत, शौचालय, पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र इमारतीची सोय करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे. 

शिक्षकांचे हाल 

एकाच छताखाली असलेले हायस्कूल सध्या इंदिरा नगर व झारी गल्लीत स्थलांतरित केल्याने हायस्कूलच्या शिक्षकांना तीन कि.मी.पर्यंत फिरावे लागते. कन्नड व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, तीन दिवस कन्नड व तीन दिवस उर्दू विभागात सेवा बजावत आहेत. 

अभाव 

सरकारी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकांचे व इंग्रजी शिक्षकाचे पद रिक्त आहे. यापूर्वी चित्रकला शिक्षक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते, तर इतिहास विभागाचे शिक्षक इंग्रजी शिकवतात. पुरेसे शिक्षक नसल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.