Sat, Jul 20, 2019 11:30होमपेज › Belgaon › लेबर इन्स्पेक्टर एसीबी जाळ्यात 

लेबर इन्स्पेक्टर एसीबी जाळ्यात 

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 08 2018 1:43AMबेळगाव: प्रतिनिधी

हॉटेल व्यवसायिकाकडून कागदपत्रे तपासणीच्या नावावर हप्ता वसूल करणार्‍या कामगार खात्याच्या वरिष्ठ कामगार निरीक्षकासह शिपायाला 3 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे एकच खळबळ माजली आहे. 

निरीक्षक भीमाप्पा जाधव आणि शिपाई राठोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहापूर भारतनगर येथे रवी केशव शिंदे यांचा हॉटेल व्यवसाय आहे. या हॉटेलमध्ये कामगार खात्याच्या अधिकार्‍यांनी जानेवारीमध्ये भेट देऊन कागदपत्रांची पाहणी करून रवी शिंदे यांना नोटीस दिली होती. त्यानंतर लाच मागितल्याप्रकरणी रवी यांनी एसीबी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबी पोलिसांनी ही कारवाई केली. भीमाप्पाने रवी यांच्याकडून प्रतिमहिना हजार रुपये अथवा वर्षाला 10 हजार रुपये लाच द्यावी, अशी मागणी केली होती. शुक्रवारी रवीने त्यांना पैसे देण्याचा निरोप देऊन बोलावून घेतले.

तत्पूर्वी, रवी यांनी त्यांना रक्‍कम कमी करण्यासाठी विनवणी केली. त्यानंतर गेल्या जानेवारी ते जूनपर्यंतच्या 6 हजार रुपयांऐवजी 3 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार सदर रक्‍कम घेण्यासाठी हे दोघे हॉटेलमध्ये गेले असता 3 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे कामगार खात्यातील अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. सर्वसामान्य नागरिकांची अधिकार्‍यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी नागरिकांनी पुढाकर घेऊन संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली पाहिजे तरच बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालणे शक्य आहे, असे एसीबीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.