Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Belgaon › कुरणेने केली मारेकर्‍यांना मदत

कुरणेने केली मारेकर्‍यांना मदत

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या बेळगावातील भरत कुरणेने मारेकर्‍यांना  लंकेश यांच्या हत्येनंतर बंगळूरहून हुबळीला पळून जाण्यास मदत केली. कुरणे याने तशी कबुली दिल्याचा दावा एसआयटी अधिकार्‍यांनी केला आहे.आतापर्यंत झालेल्या एसआयटी चौकशीतून परशुराम वाघमारे याने गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर मोटारसायकलवर असणारा संशयित हा गणेश मिस्कीन आहे. या दोघांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर बंगळुरातून त्यांना पळून जाण्यात कुरणेने मदत करताना नेलमंगल टोल नाक्याजवळ या दोघांना कुरणेने बसमध्ये बसविले. 

या हत्येतील मास्टरमाईंड म्हणून ओळखला जाणारा अमोल काळे (पुणे) याने या हत्येसाठी भरत कुरणेकडे मदत मागितली होती. त्यानुसार तो बंगळुरात येऊन कुंबलगोडी येथील एका फ्लॅटमध्ये स्वयंपाक बनवून संशयितांच्या जेवणाची व्यवस्था करत होता. त्याआधी त्याने बेळगावनजीकच्या चिखले (ता. खानापूर) येथे आपल्या शेतामध्ये पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास होकार दर्शविला होता. त्यासाठी आवश्यक ती मदत त्याने केली होती. त्याच्या शेतात संशयित राजेश डी. बंगेरा याने अनेकांना प्रशिक्षण दिल्याचे याआधीच उघडकीस आले आहे. यामुळे एसआयटी अधिकारी त्याला तीनवेळा चिखलेत घेऊन गेले. त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न एसआयटी करत आहे. 

गौरी हत्येतील संशयित परप्पन कारागृहात आहेत. यापैकी अमोल काळे, अमित दिगवेकर, सुजीत कुमार, गणेश मिस्कीन, राजेश डी. बंगेरा यांची 27 ते 31 ऑगस्टपर्यंत सीआयडी चौकशी होणार आहे.

सीआयडीकडूनही चौकशी

डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणारे सीआयडी पथक गौरी हत्या प्रकरणातील काही संशयितांची चौकशी करणार आहे. तशी न्यायालयीन परवानगी मिळाली आहे. साहित्यिक डॉ. एम. एम.  कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाडमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांचा हात कलबुर्गी हत्येमध्ये असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत. याबाबतची माहिती एसआयटीने सीआयडीला दिली आहे.