बेळगाव : प्रतिनिधी
शहापूर सरस्वती वाचनालय आयोजित पं. कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलनाला शनिवारी सुरेल स्वरांसह थाटात प्रारंभ झाला. यावेळी बेळगावचे ज्येष्ठ वैद्य डॉ. अशोक नारायण सखदेव यांना डॉ. घनशाम वैद्य यांच्यावतीने बेळगाव भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्घाटनानंतर श्रीषा आणि दिप्ती शेट्टी या भगिनींच्या भरतनाट्यम आणि शुभांगी जाधव यांच्या सुमधूर गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित संमेलनाचे उद्घाटन घटप्रभा येथील कर्नाटक आरोग्यधामचे प्रधान संचालक व वैद्याधिकारी डॉ. घनशाम वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. व्यासपीठावर सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष पी. जी. कुलकर्णी, उपाध्यक्ष एस. जी. आरबोळे, कार्याध्यक्षा स्वरुपा इनामदार, सुहास सांगलीकर, आर. एम. करडीगुद्दी, प्रकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. घनशाम वैद्य यांच्या हस्ते डॉ. अशोक सखदेव यांना बेळगाव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. वैद्य यांनी डॉ. सखदेव यांनी केलेल्या सेवाभावी वैद्यकीय पेशेची प्रशंसा केली. त्याचबरोबर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. डॉ. सखदेव यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
उद्घाटन सत्रानंतर शांतला विद्यालयाच्या नृत्यांगणा दिप्ती व श्रीषा शेट्टी यांच्या भारतनाट्यम्चा कार्यक्रम झाला. दोघी भगिनींनी कार्यक्रमाची सुरुवात गणपती कवित्वंमने केली. त्यानंतर सरस्वती स्तुती सादर करताना दोघींनीही सुंदर मुद्राभिनयासह पदलालित्य दाखवून दिले. श्रीषाने सादर केलेली अद्यांजली व दिप्तीने सादर केलेले शिवतांडव सर्वांनाच भावून गेले. मंगलमने भरतनाट्यम् कार्यक्रमाची सांगता झाली.
दुसर्या सत्रात शुभांगी जाधव (धारवाड) यांची गानमैफल पार पडली. किराणा घराण्याच्या नवोदित गायिका म्हणून ख्याती असलेल्या शुभांगी यांच्यावर पं. भालचंद्र नाकोड व विभावरी बांधवकर यांच्या संगीत शैलीचा प्रभाव असल्याचे दिसून आले. शुभांगी यांनी आपल्या गायनात संगीताचे विविध कंगोरे सादर करून उपस्थित श्रोत्यांना मुग्ध केले. शुभांगी यांच्या गायनाला संवादिनीवर मुकुंद गोरे, तबल्यावर नारायण गणाचारी तर तानपुर्यावर श्वेता हंदीगोळ यांनी सुरेल साथसंगत दिली. डॉ. घनशाम वैद्य आणि स्वाती वैद्य यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पंडित कुमार गंधर्व यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तसेच सरस्वती वाचनालयाचे संस्थापक सरजामे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ओल. पी. जी. कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वरुपा इनामदार यांनी अथितींचा परिचय करून दिला. बेळगाव भूषण पुरस्कार मानपत्राचे वाचन प्रा. अनिल चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन विनय कुलकर्णी यांनी केले. आर. एम. करडीगुद्दी यांनी आभार मानले.