Wed, Jun 26, 2019 18:32होमपेज › Belgaon › चिकोडी-सदलग्यातील  उपकालव्यास कृष्णेचे पाणी

चिकोडी-सदलग्यातील  उपकालव्यास कृष्णेचे पाणी

Published On: Jul 06 2018 11:52PM | Last Updated: Jul 06 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री कुमारस्वामींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात चिकोडी - सदलगा मतदार संघातील उपकालव्यास कृष्णा नदीचे पाणी सोडण्याच्या योजनांसाठी भरीव  100 कोटी निधीची तरतूद केली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

चिकोडी, रायबाग व हुक्केरी तालुक्यातून गेलेल्या चिकोडी उपकालव्यास हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाचे पाणी सोडण्यात येते. पण या उपकालव्याच्या व्याप्तीत चिकोडीसह हुक्केरी, रायबाग तालुक्यातील अनेक गावे येतात. यामुळे तांत्रिक कारण व अनेक गावांमुळे उपकालव्याच्या व्याप्तीत येणार्‍या टोकाच्या गावांना पाणी पोचत नाही. यामुळे कालव्याला पाणी सोडूनदेखील चिकोडी-सदलगा मतदारसंघातील हिरेकोडी, नागराळ, नेज, शिरगांव, शिरगांववाडी, वडगोल, तपकारवाडी, खडकलाट, रामपूर या गावांपर्यंत पाणी पोचत नाही. या भागातील कालवे ऐन पावसाळ्यातही पाण्याअभावी कोरडे पडत होेतेे.  दुसरीकडे हुक्केरी तालुक्यात कालव्याच्या व्याप्तीत येणार्‍या सर्व गावांना ऐन उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळत होते. 

आपल्यालादेखील पाणी मिळावे यासाठी शेतकर्‍यांनी अनेकदा जलसंपदा खात्याच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यासह तक्रारी करून आवाज उठवला  होता. शेतकर्‍यांच्या समस्येची दखल खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरींनी घेऊन कालव्याला पाणी न पोचणार्‍या गावांना थेट कृष्णा नदीचे पाणी आणून सोडण्याचा निर्णय घेतला.  

100 कोटींचा निधी

चिकोडी उपकालव्यातील हिरेकोडीनजीकच्या  53 ते 88 कि.मी.पर्यंतच्या कालव्याच्या व्याप्तीतील सर्व शेतकर्‍यांच्या जमिनींना पाण्याची सोय व्हावी, यासाठी आमदार व खासदार हुक्केरींनी  सरकारवर दबाव आणला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे.

काय आहे योजना?

चिकोडी उपकालव्याच्या कि.मी. 53 ते 88 पर्यंतच्या व्याप्तीतील 10,255 हेक्टर जमिनीस कृष्णा नदीतून सुमारे 150 क्युसेक्स पाणी कालव्याला सोडण्याची योजना आहे. यामुळे कालव्याच्या व्याप्तीत येणार्‍या चिकोडी-सदलगा मतदारसंघातील हिरेकोडी, नागराळ, नेज, शिरगांव, शिरगांववाडी, वडगोल, तपकारवाडी, खडकलाट, रामपूर आदि गांवांमधून गेलेल्या कालव्याला पाणी मिळणार आहे.