Tue, Jun 25, 2019 15:21होमपेज › Belgaon › कोलेकर कुटुंब रंगलंय खेळात ...

कोलेकर कुटुंब रंगलंय खेळात ...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : संदिप तारीहाळकर 

मूळचे गर्लगुंजीचे (ता. खानापूर). नोकरीच्या निमित्ताने बेळगावात राहणारे क्रीडाशिक्षक लक्ष्मण कोलेकर यांचे सारे कुटुंबच खेळात रंगले आहे. लक्ष्मण कोलेकर यांचा मुलगा विश्‍वंभर आंतरराष्ट्रीय आशियायी धावपटू. जपानमध्ये होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी होण्याची जिद्द बाळगून आहे. सध्या तो बंगळूर येथे महिन्याला 42 हजार रुपयांची पदरमोड करून सराव करत असून त्याला पाठबळ देण्यासाठी कुटुंबच बंगळूरला स्थलांतर झाले आहे. विश्‍वंभरचे ऑलिंपिकचे ध्येय पूर्ण होण्यासाठी तिची मोठी बहीण राष्ट्रीय खो-खोपटू मीलन, लहान बहीण राष्ट्रीय धावपटू व सध्या रेल्वे स्पोर्टस्कडे लिपीक म्हणून कार्यरत असणारी ज्योती कोलेकर यांच्यासह वडील लक्ष्मण भक्कम पाठबळ देत आहेत. 

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियायी स्पर्धेमध्ये 800 मी. धावणेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून विश्‍वंभरने अंतिम फेरी गाठून भारताची मान उंचावली. सध्या तो 2020 मध्ये जपानमध्ये होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंगळूर येथे जोरदार तयारी करीत आहे. 

विश्‍वंभरने अ. भा. पातळीवरील 800, 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सतत तीन वर्षे विजयाची मालिका राखून 24 हून अधिक पदके मिळविली आहेत. विजापूर येथे झालेल्या कर्नाटक विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्याने 800 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त क़रून विक्रम नोंदविला आहे. स्पर्धेत आर. एन. धरमट्टी यांचा 24 वर्षे अबाधित असलेला विक्रम विश्‍वंभरने 54 सेकंदामध्ये पूर्ण करुन मोडला आहे. 

1985 साली धारवाड येथे झालेल्या कर्नाटक राज्य ऑलिंपिक अ‍ॅथलेटिक स्पर्धेत सत्यनारायण यांनी 1500 मीटरचे अंतर 3 मिनिटे 50 सेकंदात पूर्ण करून नवीन विक्रम नोंदविला होता. 32 वर्षे आबाधित असणारा विक्रम विश्‍वंभरने मोडला. विश्‍वंभरने हेच अंतर 3 मिनिटे 45.4 सेकंदात पूर्ण करून विक्रम नोंदविला. कर्नाटक राज्य ऑलिंपिक संघटनेतर्फे धारवाडला आयोजित 800 मीटर धावण्याची स्पर्धा 1 मिनिट 47.4 सेकंदात पूर्ण करून 1986 मधील दामोदर रुद्रगौडाचा 30 वर्षे अबाधित असणारा विक्रम मागे टाकला. 

म्हैसूर येथील दसरा स्पोर्टस्मध्येही विश्‍वंभरने सतत 3 वर्षे 800 मीटर, 1500 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळवून हॅटट्रिक साधली आहे.