Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Belgaon › महामार्गावर वाढताहेत ‘किलर स्पॉट’!

महामार्गावर वाढताहेत ‘किलर स्पॉट’!

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 9:08PM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील 

तवंदी घाट ते कोगनोळी या 30 कि.मी. टापूत केंद्र सरकारच्या  बांधकाम विभागाने सूचित केलेल्या सूचनेनुसार 100 ठिकाणे ‘किलर स्पॉट’ म्हणून निश्‍चित केली आहेत. या टापूत गेल्या वर्षभरात विविध अपघातांत किमान 27 जणांचा बळी गेला असून गेल्या पंधरवड्यात नवीन सालात 7 जणांना प्राण गमवावा लागला आहे.

2004 साली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पुंज लॉईड कंपनीकडून चांगल्या प्रकारे झाले आहे. मुख्य रस्त्यासह सेवारस्त्याला लागून असणार्‍या बाजूपट्ट्या रस्त्याच्या नूतनीकरणानंतर भरून न घेतल्याने, हा रस्ता वाहनांना कर्दनकाळ ठरत आहे. मुख्य व सेवारस्त्याचे काम चांगले झाले तरी अधिक उंचीच्या बाजूपट्ट्याच धोक्याच्या आहेत. होनगा ते कोगनोळी या 77 कि. मी.च्या पट्ट्यात कंपनीच्यावतीने दुसर्‍यांदा डांबरीकरण झाले आहे. 

वर्षभरात तवंदी ते कोगनोळी टापूत 35 दुचाकींसह 15 लहान माठे  अपघात झाले आहेत. महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी अनेक ठिकाणी लहान-मोठे सुमारे  50 भुयारी मार्ग पुंज लाईडने बांधले आहेत. मुख्य रस्त्यासह सेवा रस्त्याचे डांबरीकरण करताना त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढविली आहे. यामुळे अनेक ठिकाणी बाजूपट्टीवरून वाहन खाली अथवा वर घेताना चालकांना धोका पत्करावा लागतो. बाजूपट्ट्या भरण्याच्या कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदराकडून अनेक कामे व्यवस्थित झालेली नाहीत. 

एकमात्र खरे की...

2004 ते 2019 पर्यंत या महामार्गाची जबाबदारी घेतलेली कंपनी चांगली सेवा देत आहे. दिवसरात्र भरारी पथकाचा फायदा वाहनधारकांना अडचणीच्या प्रसंगी होत आहे.  कंपनीने ठिकठिकाणी फलक उभारले आहेत. दुभाजकातील झाडांसह दुतर्फा झाडांचीही वेळोवेळी देखभाल होते.

ही आहेत कारणे...

सदोष  रस्ते, निकृष्ट कामे, वाहनांची गती, बेशिस्त ड्रायव्हिंगमुळे अनेकांचे लाख मोलाचे प्राण अपघातात जात आहेत. दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरची धोकादायक वळणे, संपर्क रस्ते अथवा पडलेला खड्डा व चरी लक्षात येत नसल्याने अपघात घडल्याचे दिसून आले आहे. महामार्गाकडेला थांबलेल्या प्रवाशांना वाहनांची धडक बसूनही अपघात घडले आहेत. किलर स्पॉटच्या जागा निश्‍चितीच्या आधारे खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत वाहनधारकांनी व्यक्‍त केले.