Sat, Feb 23, 2019 06:06होमपेज › Belgaon › सावधान... मरण स्वस्त होत आहे

सावधान... मरण स्वस्त होत आहे

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 8:42PM

बुकमार्क करा

खानापूर ः वासुदेव चौगुले

मागील दोन- तीन वर्षांपासून विविध कारणांनी आत्महत्या करुन जीवन संपविणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कर्जबाजारीपणा, कौटुंबिक कलह, नैराश्य, अति मद्यसेवन, दीर्घकालीन आजार आणि मानसिक तणाव या कारणांमुळे मरणाला जवळ केले जात आहे. पोलिस स्थानकामधील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आत्महत्या प्रकरणांच्या नोंदीवरुन खरंच मरण इतकं स्वस्त होत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकट्या खानापूर तालुक्यात यावर्षी तब्बल 77 जणांनी विविध मार्गांनी जीवन संपविले. दरवर्षी आत्महत्या प्रकरणांचा आकडा वाढतच असल्याने सामाजिक व मनोविकार तज्ज्ञांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

जानेवारी 2017 पासून आजपर्यंत खानापूर पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत 38 आत्महत्या झाल्या आहेत. तर नंदगड पोलिस स्थानकाच्या हद्दीत 39  आत्महत्या प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील सर्व रेकॉर्ड मोडणारी ही आकडेवारी असून पोलिस यंत्रणेसाठी आत्महत्या प्रकरणांची नोंद ठेवणे डोकेदुखीचे काम ठरत आहे. महिन्याकाठी चार ते पाच आत्महत्येच्या प्रकरणांची नोंद होत असल्याने पोलिस यंत्रणेलाही याबाबत विचार करणे भाग पडले आहे. नदीकाठ, जंगलातील निर्जनस्थळे, रेल्वेरुळ यासारख्या ठिकाणांची आत्महत्येसाठी निवड केली जात असल्याने पोलिसांनी अशाठिकाणी नियमितपणे देखरेख ठेवणे आवश्यक आहे. शहरातील जुन्या पुलावरुन उडी घेऊन आत्महत्येचे प्रकार रोज घडत असत. मात्र वर्षभरापूर्वी जुना पूल काढण्यात आल्याने काहीअंशी शहराच्या व्याप्तीतील आत्महत्येच्या घटनांना चाप बसला आहे.

नंदगड पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत झालेल्या आत्महत्या प्रकरणांमध्ये कर्जबाजारीपणामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. तालुक्यात वर्षभर 32 जणांनी गळफास, 30 जणांनी विषप्राशन, 12 जणांनी पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद आहे. नैराश्यातून बाहेर येण्यासाठी अबोल राहणार्‍या व्यक्तीशी मुक्त संवाद निर्माण करणे आवश्यक आहे. यामध्ये कुटुंबियांची भूमिका मानसशास्त्रज्ञापेक्षा महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ‘या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे.’ मानवी जीवनाचे महत्त्व विशद करणार्‍या या ओळी समजून घेऊन जीवनाचे सुंदर गीत गाण्यासाठी निराशेवर मात करणार्‍या विचारांची आजघडीला नितांत गरज आहे.