Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Belgaon › साडेचार वर्षांनंतर सेनेची डरकाळी!

साडेचार वर्षांनंतर सेनेची डरकाळी!

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 9:48PM

बुकमार्क करा

खानापूर : वासुदेव चौगुले

म. ए. समितीने नेहमीच शिवसेनेला गृहित धरुन राजकारण केले. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. समितीकडून शिवसेनेला नेहमीच  दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोपही करण्यात आला असला तरी केवळ निवडणुकीच्या तोंडावरच अशाप्रकारच्या हक्काची आणि समान वागणुकीची अपेक्षा न करता सेना कार्यकर्त्यांनीही सतत क्रियाशील राहणे तितकेच आवश्यक आहे. सीमाभागातील मराठीजणांसाठी तरी तेच फायद्याचे ठरणार आहे, असे मत व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे संयुक्त महाराष्ट्रासाठीचे योगदान  नाकारता येणार नाही. सध्या महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत भागीदार आहे. त्यामुळे सीमाप्रश्‍नी मुंबईतील घडामोडींसाठी सेनेची नाराजी घेऊन समितीला परवडणारे नाही. या पार्श्‍वभूमीवर खानापूर तालुका शिवसेनेने समिती नेतृत्वावर केलेले आरोप गांभीर्याने घ्यावे लागणार आहेत. मुळात समिती संघटनेपेक्षा समितीच्या लोकप्रतिनिधींवर शिवसेनेची खरी नाराजी आहे. कारण आ. अरविंद पाटील यांच्या विजयासाठी जसे समिती कार्यकर्ते राबले तसेच शिवसैनिकही प्रामाणिकपणे राबले.

मात्र निवडणुकीनंतर शिवसैनिकांना कोणीच विचारात घेतले नाही. समितीच्या पाठीमागून येण्याशिवाय सेनेला पर्याय नाही, जणू अशी भावनाच वाढीस लागल्याने दिवसेंदिवस समिती आणि शिवसेना यातील दरी रुंदावत गेली. आजघडीला शिवसेनेचे तालुका प्रमुख पद रिक्त आहे. नारायण मयेकर यांच्यानंतर नव्या प्रमुखांची निवड झालेली नाही. तालुका उपप्रमुख दयानंद चोपडे हेच सेनेची जबाबदारी सांभाळत आहेत. माळअंकले, झाड-अंकले, गणेबैल, खानापूर या भागात अनेकजण शिवसेनेला मानणारे आहेत.

त्या कार्यकर्त्यांच्या बळावर चोपडे यांनी तालुक्यात सेना जिवंत ठेवली आहे. मात्र निवडणुकीचा कालावधी सोडला तर शिवसैनिक कोठेच मराठी आणि मराठी भाषिकांसाठी भांडताना अथवा आंदोलन करताना दिसत नाहीत. त्यामुळे सेनेचे नेमके अस्तित्व कशासाठी आहे, असा सवाल सर्वसामान्य मराठी भाषिकांतून विचारला जात आहे. समिती-शिवसेना युती काय करु शकते हे 2005 च्या ता. पं व जि. पं निवडणुकीच्यानिमित्ताने तालुक्याने अनुभवले आहे. शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्तेचा गड सर करणे समितीला तेव्हा अशक्य होते. आजघडीला शिवसेनेतील अनेकजण समितीवासीय झाल्याने 2005 इतका जोर सेनेतही राहिला नाही. तरीदेखील ऐन मोक्याच्या क्षणी मराठी भाषिकांत बेकी होणे हे सीमाप्रश्‍नासाठी घातक आहे.