Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Belgaon › रेल्वेलाईन वन्यप्राण्यांची कर्दनकाळ

रेल्वेलाईन वन्यप्राण्यांची कर्दनकाळ

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 12:49AMखानापूर : वासुदेव चौगुले

पोषक हवामान, मुबलक खाद्य, घनदाट अरण्य आणि जागोजाग पाण्याचा साठा यामुळे खानापूरचे जंगल रानगव्यांसाठी आश्रस्थान बनले आहे. पण सहा महिन्यांत रेल्वेच्या धडकेत चार रानगव्यांना जीव गमवावा लागला. वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे सत्र थांबणार का, असा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मुक्‍त विहार आणि मनसोक्‍त आहाराच्या शोधात गव्यांचे कळप रेल्वेलाईनपर्यंत येऊन पोहचतात. रेल्वेतून प्रवाशांनी टाकलेले खाद्यपदार्थ आणि प्लास्टिकच्या वासाने रानगवे सायंकाळच्या सुमारास रेल्वेलाईनच्या दिशेने येतात. पाण्यासाठी नदीकडे जाताना रेल्वेलाईन ओलांडावी लागते.

बहुतांशवेळा रूळ पार करताना रेल्वेची धडक बसून गव्यांना जीव गमावावा लागत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या जीवावर उठलेल्या रेल्वेलाईनची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी दोन्ही विभागांकडून संयुक्‍त प्रयत्न होण्याची गरज आहे.जंगलालगतच्या भागात सुपीक शेती असल्याने वारंवार रानगवे शिवाराकडे धाव घेतात. वाढत्या अपघाती मृत्यूमुळे रानगव्यांच्या संख्येत घट होत आहे. परिणामी तालुक्यातील जंगल वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुर्मीळ नैसर्गिक ठेव्याचे जतन करण्यासाठी भीमगड संरक्षित अभयारण्याची घोषणा करुन हरित खानापूरची संकल्पना तडीस नेण्यासाठी युद्धपातळीवर कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न वनखात्याकडून केला जात आहे.

यासाठी शिकारविरोधी कॅम्प व विशेष पथकांची निर्मिती करून समृद्ध वन्यजीवांचे रक्षण केले जात असल्याचे सांगण्यात येते. नियमित गस्त घालून शिकारीसह जंगलातील अवैध प्रवेश आदी बाबींना आवर घालण्यात यश आले आहे. बाहेरून खानापूर जंगलाच्या सीमा सुरक्षित झाल्या आहेत. मात्र, जंगलाच्या आतील भागात ठिकठिकाणी धोकादायक रेल्वेलाईन, लोंबकळणार्‍या वीजवाहिन्यांच्या रूपाने मृत्यूचे सापळे वन्यजीवांच्या जीवावर उठले आहेत. यावर काय उपाययोजना करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.खानापूर तालुक्याच्या हद्दीतून गेलेल्या अवघ्या 20 कि. मी. अंतरावरील रेल्वेलाईनच्या दरम्यान सहा महिन्यांत चार रानगव्यांचा रेल्वेच्या धडकेत जीव गेला. वारंवार घडणार्‍या घटनांनंतर वनखाते शहाणे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, व्यवस्थेतील दोषांमुळे वन्यप्राण्यांचे रक्‍त सांडण्याचे प्रकार सुरूच असून जबाबदार घटकांनी एकमेकांकडे बोट न करता जमेल ते प्रयत्न करायला  हवेत.