Mon, Jul 22, 2019 01:30होमपेज › Belgaon › प्रवाशांनो, माकडांना खाद्य टाकताय...जरा थांबा

प्रवाशांनो, माकडांना खाद्य टाकताय...जरा थांबा

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 27 2017 10:19PM

बुकमार्क करा
खानापूर : वासुदेव चौगुले

तालुक्याच्या घनदाट जंगलातून जाणार्‍या महामार्गांवर ठिकठिकाणी माकडांचे कळप बसलेले आढळून येतात. रस्त्याकडेला खाद्याच्या प्रतीक्षेत रांगेत बसलेली माकडे बेळगाव-गोवा आणि चोर्ला महामार्गावर दृष्टीस पडतात. अनेक प्रवासी या माकडांना वेफर्स, बिस्किट, पाव, पॉपकॉर्न यासारखे खाद्यपदार्थ टाकतात. मात्र बर्‍याचदा हेच प्राणीप्रेम त्यांच्या मृत्यूला कारण ठरत असल्याची बाब एका पाहणीतून समोर आले आहे. माकडांची शरीररचना जंगलातील फळे, कंदमुळे आणि निसर्गात सहज उपलब्ध होणार्‍या आहाराशी सुसंगत असते. त्यांच्या पचनयंत्रणेची निश्‍चित अशी साखळी कार्यरत असते. मात्र प्रवाशांकडून टाकण्यात येणार्‍या पिष्टमय पदार्थांमुळे माकडांच्या पचन संस्थेवर विपरित परिणाम घडत आहे.

रोजच हे पिष्टमय पदार्थ खाल्ल्याने माकडांना जंगलात सहज उपलब्ध होणारे दुसरे खाद्य नकोसे वाटू लागत आहे. परिणामी ते दिवसभर रस्त्याकडेला वाहनांतून खाद्यपदार्थ टाकले जातील, या आशेने वाट पाहात असल्याचे दिसते. प्रवाशांची ही भूतदया आता माकडांची आहार पद्धतच पूर्णपणे बदलण्यास कारणीभूत ठरत आहे.   माकडे स्वतःचे खाद्य स्वतः मिळविण्यासाठी समर्थ असतात. माकडांसह सर्वच पशू-पक्ष्यांना जन्मजातच ती कला अवगत असते. कोणतेही माकड आहाराअभावी उपाशी राहून मरत नाही. हा निसर्ग नियम आहे. मात्र प्रवाशांकडून होणार्‍या अन्नदानामुळे जंगलात जाऊन आहार शोधायची माकडांची प्रवृत्तीच नाहीशी होत असून माकडे पूर्णपणे या मानवनिर्मित खाद्यावर अवलंबून राहत असल्याचे प्रमाण वाढले आहे.

 जंगलात व रस्त्याकडेला मृत अवस्थेत पडलेल्या काही माकडांचे शवपरीक्षण केल्यानंतर बहुतांशवेळा माकडांचा उपासमारीने अथवा अमर्याद स्वरुपात पिष्टमय पदार्थांच्या सेवनाने मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे एखादे माकड मरण पावल्यास त्याच्या शरिराचे अवशेष उघड्यावर राहून रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. यावर उपाय म्हणून कोठेही मृत माकड आढळल्यास वनखात्याने त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यामुळे माकडताप व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव करता येतो.  श्रद्धेच्या भावनेतून माकडांना अन्नदानाची प्रथा आहे. विशेषकरुन तालुक्याच्या गंगवाळी, शिंदोळी, सावरगाळी, नायकोल, माणिकवाडी, गुंजी, वाटरे, लोंढा, रामनगर यासह चोर्ला मार्गावरील अनेक गावांच्या वळणांवर माकडांचे कळप खाद्याच्या प्रतीक्षेत आसुसलेले पाहावयास मिळतात.