Fri, Apr 26, 2019 18:19होमपेज › Belgaon › गोधोळीनजीक अपघात; पत्रकाराचा जागीच मृत्यू

गोधोळीनजीक अपघात; पत्रकाराचा जागीच मृत्यू

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:12AM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

गोव्याहून रामनगरमार्गे धारवाडला निघालेल्या पर्यटकांच्या कारची झाडाला धडक बसल्याने गोधोळीनजीक झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. डॉ. विरेश हिरेमठ (वय 36, रा. बागलकोट) असे मृताचे नाव असून, विविध कन्नड दैनिकांत ते नामवंत पत्रकार, तसेच पत्रकारिता महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी गौरी (30) व कारचालक सुनील हे दोघेजण जखमी झाले असून, धारवाडमधील खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धारवाड-रामनगर मार्गावर शनिवारी मध्यरात्री 1 वा.च्या सुमारास हा अपघात घडला. गुरुवारी विरेश हे पत्नी गौरी, मुले विजय व विवेक यांच्यासोबत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. शनिवारी घरी परत येत असताना रामनगर या ठिकाणी ते जेवणासाठी थांबले. तेथून धारवाडमार्गे बागलकोटला जाण्यासाठी निघाले. दरम्यान, खानापूर तालुक्यातील गोधोळी गावानजीकच्या वळणावर अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध बाजूच्या झाडाला धडक बसली. डाव्या बाजूने कारचा चक्काचूर झाल्याने समोर बसलेल्या विरेश यांना छाती व डोक्यावर जबर मार बसून ते जागीच ठार झाले.

नंदगड पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच जखमींना धारवाडमधील एसडीएम दवाखान्यात दाखल करण्यात आले. सुदैवाने विरेश यांच्या दोन्ही मुलांना काही दुखापत झाली नाही. रविवारी दुपारी शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत डॉ. विरेश यांनी विविध दैनिकांसह वृत्तवाहिन्यांवर बातमीदार म्हणून काम केले आहे.