Tue, Nov 20, 2018 03:17होमपेज › Belgaon › हेस्कॉम ठेकेदारांकडून निकृष्ट इलेक्ट्रिक साहित्याचा वापर

हेस्कॉम ठेकेदारांकडून निकृष्ट इलेक्ट्रिक साहित्याचा वापर

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 8:11PMखानापूर : वार्ताहर

हेस्कॉमचे ट्रान्स्फॉर्मर, वीजवाहिन्या, मीटर तसेच विजेचे खांब ठेकेदारांकरवी बसविण्यात येतात. अलिकडे सदर ठेकेदार अधिक फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याने अनेकदा नादुरुस्ती होऊन विजेची समस्या उद्भवत आहे. तसेच नागरिकांच्या जीवासही धोका निर्माण होत आहे. ग्रामीण भागात पंपसेट वारंवार बिघडण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वीजपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर व इतर उपकरणे निकृष्ट  असून त्यामध्ये बिघाड असल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत  आहे. वारंवार ट्रान्स्फार्मर नादुरुस्त झाल्यासे नवीन ट्रान्स्फॉर्मरची आठवडाभर वाट पाहावी लागते.

परिणामी पिके वाळून जातात. ही समस्या कायमचीच झाल्याने शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ट्रान्स्फॉर्मर व इतर साहित्य मिळविताना हेस्कॉम कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. संबंधित ठेकेदारांनी उत्तम दर्जाचे साहत्य वापरले आहे की नाही, याची तपासणी हेस्कॉमच्या अधिकार्‍यांकडून होत नाही. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकार्‍यांचे लागेबांधे असल्याचे  लपून राहिलेले नाही. मात्र यात सामान्य शेतकरी भरकटत चालला असून लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.