Thu, Apr 25, 2019 22:16होमपेज › Belgaon › दिव्यांगाच्या कुंभारकलेचा परदेशात डंका

दिव्यांगाच्या कुंभारकलेचा परदेशात डंका

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 8:16PM

बुकमार्क करा

खानापूर : राजू कुंभार

अपंगत्वावर हिमतीने मात करून कुंभारकला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ते नेपाळ आणि चीनमध्येही पोहोचविण्याची किमया फुलेवाडी (डुक्करवाडी) या छोट्याशा गावातील पुंडलिक कुंभार याने केली आहे.  डी.एड. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा आणि नोकरी मिळविण्यात अपयश आल्याने खचून न जाता कुंभारकलेत  करिअर करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अपंगत्वाच्या दु:खाने अनेकांनी जीवन संपविल्याच्या घटना घडतात.  पुंडलिकने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर 15 लोकांना काम देणारी कुंभारशाळा सुरू केली. विशिष्ट गरुशिवाय स्वतकौशल्याने पारंपरिक कुंभारकलेला आधुनिकतेची जोड देत कला त्याने जपली. समृध्द केली आहे. ‘गुगल माझा गुरु’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

भांड्यांना परदेशात पसंती मातीच्या वस्तूंना स्थानिक बाजारात चांगली मागणी नसली तरी देश-विदेशात वस्तूंची चांगली क्रेझ आहे. विकसित देशातील लोकांनी आपल्या स्वयंपाकखोल्यातील धातू आणि काचेची भांडी बाजूला सारून मातीच्या भांड्यांना मोठी पसंती दिली आहे. यामुळेे मातीच्या भांड्यांना मोठी मागणी आहे. पुंडलिकच्या कुंभारशाळेतील भांडी महाराष्ट्र आणि गुजरातमधील एजंटांकडून नेपाळ, चीन, जर्मनी आणि अमेरिकेपर्यंत पोहोचली आहेत. बुध्दाच्या मुखवट्यांची नेपाळला तर कर्नाटकासह दक्षिण भारतात दही आणि ताकासाठी छोट्या लोटक्यांची मोठी मागणी आहे. पुंडलिकला फेसबुकच्या माध्यमातून परदेशातील ऑर्डर मिळतात. 

कुंभारशाळेत मातीच्या सुरई, माठ, रांजण, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, बेल, देवदेवता आणि महामानवाच्यांच्या मूर्ती-मुखवटे, स्वयंपाकाची भांडी, पाण्याच्या बाटल्या-तांबे, हॉटेलच्या डिशप्लेट, पंचतारांकित हॉटेलमधील सजावटीच्या वस्तू, पेन आणि मोबाईल स्टँड, वॉलपीस, वाद्यांचे साहित्य, फुलदाण्या, भाजी ठेवण्याचे कूलर, पाणी फिल्टर व मातीचे दागिनेही तयार होतात.  
खानापूरच्या मातीला आवाज आणि विशिष्ट रंग असल्याने साठ वषार्ंपूर्वी केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. येथील मातीपासून संगीतात वापरात येणारी काही वाद्ये बनविली जातात. यामध्ये माठ, डग्गा, आफ्रिकन वाद्य कांगो, घुमट, तंतूवाद्यामध्ये मातीचे घटक बसविण्यात येतात. शिमग्यात गोव्यामध्ये घुमट वाद्याला मोठी मागणी असते.

  - मंदिरा कुंभार

 कुंभारशाळेने  गावातील 15 महिलांना व युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. चिखल गाळणे, मळणे, भट्टीसाठी लाकूड जमविणे, भट्टी लावणे, दागिनेे तयार करणे, पणत्या बनविणे, पॅकिंग आदी कामे महिला करतात. नवे शिकण्याची संधीही मिळते.

   - पुंडलिक कुंभार 

आपल्या यशात गावकर्‍यांसह समाजाचा मोठा वाटा आहे.  मधु कुंभार व भैरु कुंभार यांच्यासह जोतिराव फुले संघटनेचे सहकार्य व उद्योजक मोहन कुंभार यांचे पाठबळ यामुळे सुशिक्षित बेकाराला त्याच्या कलेसह उद्योगालाही चालना मिळाली. सहकार्‍यांच्या पाठिंब्यामुळे अपंगत्वाचे ओझे कधीही जाणवले नाही.