Fri, Jul 19, 2019 01:22



होमपेज › Belgaon › शेतकरी अडकले सावकारी पाशात !

शेतकरी अडकले सावकारी पाशात !

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 05 2017 10:09PM

बुकमार्क करा





खानापूर : राजू कुंभार

सुगीच्या काळात दरवर्षी सावकारांच्या टोळ्या ग्रामीण भागात फिरताना दिसतात. शेतकर्‍यांनी घेतलले कर्ज फेडले नसल्याने व्याजाखातर  खळ्यावरून  भाताची उचल करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. सहकाराचे जाळे पसरले असले तरी अद्यापही पारंपरिक सावकारी संपण्याच्या मार्गावर नाही. कर्जाच्या खाईत लोटून सर्वसामान्यांना लुटण्याचा हा धंदा आजही तालुक्यात राजरोसपणे सुरू असून जमिनी बळकावल्याचीही चर्चा आहे.

सावकारी पध्दत अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. पेरणीच्या हंगामादरम्यान शेतकर्‍यांना कर्ज दिले जाते आणि त्याबदल्यात भात घेतले जाते. भाताचे उत्पादन कमी झाले तरी त्याचे सावकाराला काही देणेघेणे नसते. त्यामुळे शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येते. सध्या शहरातील काही काहींनी फायनान्सच्या नावाखाली कायदेशीर सावकारी सुरू केली असून सामान्यांच्या लुटीचा हा धंदा तालुक्यात तेजीत आहे. 

अलिकडे कृषी सहकारी संस्थांकडून बर्‍यापैकी कर्जाची आणि विविध कृषी उपयोगी साधनांची सोय करून दिली जात असली तरी शेतीतून होणारे उत्पन्न आणि कर्जाचा बोजा याचा कुठेच ताळमेळ बसत नाही.यामुळे शेतकर्‍याला  सावकाराची पायरी चढावी लागते. कर्जाची परतफेड न झाल्यास  सावकारांकडून दमदाटी करून शेतजमिनी गहाणवट किंवा स्वत:च्या नावे करून घेतल्या जातात. अशा पध्दतीने सावकारांनी तालुक्यात अनेक जमिनी घेतलेल्या आहेत. तालुक्यातील पध्दत पाहता शेतकर्‍यांच्या जमिनी सावकाराच्या घशात जाऊन पुन्हा वेठबिगारीची भीती निर्माण झाली आहे.
फायनान्सच्या आडून सावकारशाही    

खानापुरात अनेक वर्षांपासून सावकारीचा धंदा चालतो. अलिकडे सावकारशाहीविरोधात शासनाने कडक धोरण अवलंबण्याची भाषा सुरू केल्यानतर सावकारांनी फायनान्सच्या नावाखाली कायदेशीर सावकारीला सुरूवात केली आहे. तालुक्यात तीनशेच्या आसपास सहकारी संस्था असूनही सहकार चळवळीचा बोजवारा उडाल्याचे पाहावयास मिळते. कारवाई कोण करणार?   सर्रास सावकार पोलिसांच्या जवळचे आहेत. पोलिसही त्यांच्यामागे फिरताना दिसतात.

त्यामुळे या सावकारांवर कारवाई कुणी करायची, हा प्रश्‍नच आहे. एखाद्या कर्जदाराने तक्रार करण्यासाठी चुळबुळ केल्यास त्याला थेट पोलिसी खाक्या दाखविला जातो. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला सर्वसामान्य तक्रार करायचे धाडस करीत नाही.  बहुजन समाजातील ज्या नेत्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्याकडूनही या सावकारांचे लांगुनचालन केले जाते. यामुळे सावकारशाही फोफावली आहे. पोलिसी पाठबळ आणि राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे सावकारशाहीची पाळेमुळे घट्ट होऊन पाश आवळला जात आहे.