होमपेज › Belgaon › शेतकर्‍यांच्या वेदनांशी समरस होण्याची गरज 

शेतकर्‍यांच्या वेदनांशी समरस होण्याची गरज 

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 8:52PMखानापूर : प्रतिनिधी

बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. त्याने जर काम बंद केले. तर जगाचे रहाटगाडगे जिथल्या तिथे थांबून जाईल. त्याच्या कष्टाची जाण ठेवून सामाजिक बांधीलकीच्या नजरेने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे पाहिले पाहिजे. त्यासाठी पांढरपेशी समाजाने शेतकर्‍याच्या व्यथा व वेदनांशी समरस होण्याची गरज असल्याचे मत  अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. पारवाड (ता. खानापूर) येथील सातेरी केळबाय मंदिराच्या वार्षिकोत्सवानिमित्त आयोजित अनासपुरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या उलट-सुलट या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. आ. अरविंद पाटील यांच्याहस्ते नाटकाचे उद्घाटन झाले. ग्रा. पं. चे माजी उपाध्यक्ष कृष्णा गावडे अध्यक्षस्थानी होते.

शेतकर्‍यांना भोगाव्या लागणार्‍या हालापेष्टा पांढरपेशी वर्गालाही कळाव्यात. घाम गाळूनही जेव्हा पुरेसा मोबदला पदरी पडत नाही. जगाच्या अन्नदात्याला खाली पोटी झोपावे लागते. तेव्हा नेमके काय होते, याबाबत शहरी समाजाला कष्टकर्‍याचे दुःख कळावे. यासाठी उलट-सुलट या नाटकाची निर्मिती केल्याचे अनासपुरे म्हणाले. आ. पाटील यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनासपुरे यांनी चालविलेल्या शेतकर्‍यांसाठीच्या अभिनव उपक्रमाचे कौतूक करुन अभिनय आणि नाटकाच्या माध्यमातून सीमाप्रश्‍नाचाही महाराष्ट्रभर जागर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. माजी सभापती मारुती परमेकर, श्रीकांत गावकर, कृष्णा गावडे यांचीही भाषणे झाली.

शिवाजी गावडे यांनी प्रास्ताविक केले. नाटककार विठ्ठल पारवडकर यांनी स्वागत केले. आ. पाटील व जांबोटी विभागाचे जि. पं. सदस्य जयराम देसाई यांनी दीपप्रज्वलन केले. आ. पाटील यांच्याहस्ते अनासपुरे यांचा शाल, श्रीफळ व गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य बालभवनच्या अध्यक्षा डॉ. अंजली निंबाळकर, मारुती कोडचवाडकर, पी. एच. पाटील, मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन गोपाळ पाटील, जगन्नाथ बिर्जे, गोपाळ देसाई, पुंडलिक पाटील, पुष्पा नाईक, संजय पाटील, रुक्मिणी गुरव, वासुदेव पाटील आदी उपस्थित होते.  अनासपुरे यांची मुख्य भूमिका असलेल्या नाट्याविष्काराची अनुभूती घेण्यासाठी परिसरासह नजीकच्या गोवा व महाराष्ट्रातूनही हजारो रसिकांनी गर्दी केली होती.