Mon, Jul 22, 2019 13:26होमपेज › Belgaon › खानापूर तालुक्यात पाणीटंचाईची झळ

खानापूर तालुक्यात पाणीटंचाईची झळ

Published On: Mar 26 2018 1:18AM | Last Updated: Mar 25 2018 10:21PMखानापूर : वासुदेव चौगुले

नदी-नाल्यांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या खानापूर तालुक्यात काही वर्षापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  मानवालाच नव्हे तर जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा वणवण करण्याची वेळ आली आहे. उन्हाळी शेतीसाठी वरदान ठरणार्‍या शेकडो तलावांनी महिनाभरापूर्वीच तळ गाठल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. ग्रामीण भागांत उपलब्ध नैसर्गिक जलस्रोतांचा शेतीला मोठा आधार असतो. शासनाने कूपनलिका खोदण्यावर अटी लादल्या आहेत. यामुळे नव्या बोअरचे प्रमाण घटले आहे. यातच नाल्यांसह तलावांची पाणीपातळी खालावल्याने या जलसाठ्यांवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी उन्हाळी पिके हात देण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात शेती व जनावरांच्या पाणीपुरवठ्यासाठी गावोगावी तलावांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा गेल्या वर्षी निम्म्या पावसाची नोंद झाल्याने हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. यातच उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर न झाल्याने गळती आणि अतिक्रमणांमुळे अनेक तलावांचे अस्तित्वही शोधावे लागते. पश्‍चिम आणि उत्तर भागापेक्षा तालुक्याच्या मध्य आणि पूर्व भागातील प्रत्येक गावाला तीन ते चार तलावांचे वरदान लाभले आहे.उन्हाळ्यात नदी व नाल्यांतील पाणीपातळी कमी झाल्यानंतर या तलावांचा शेतकरी व पशुपालकांना मोठा आधार असतो.

शेतीनंतर पशुपालन हा ग्रामीण कष्टकरी जनतेचा दुय्यम व्यवसाय असल्याने जनावरांच्या पाण्यासाठी सर्वस्वी तलावावरच अवलंबून राहावे लागते. चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असणार्‍या तळ्यांचे एकदाही पुनरुज्जीवन झाले नसल्याने बांध, खोली व नाल्यांची दुरुस्ती झालेली नाही. तलावांत गाळ साचून राहिल्याने जलसाठ्याची क्षमता कमी झाली आहे. रोहयो व तळी विकास योजनांतून कोट्यवधीचा निधी खर्च करून तलावांचा विकास सुरू असल्याचे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात तलावांचे वैभव लयाला जात असल्याचे दिसून येते. तलाव संरक्षण समित्यांद्वारे तलाव भरण व पुनरुज्जीवन आदी कामे राबविण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.