Thu, May 28, 2020 10:17होमपेज › Belgaon › अरविंद पाटील हेच समितीचे उमेदवार : डॉ. एन. डी. पाटील

अरविंद पाटील हेच समितीचे उमेदवार : डॉ. एन. डी. पाटील

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 19 2018 12:00AMखानापूर/कोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून खानापुरातून म.ए. समितीची अधिकृत उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. बुधवारी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी खानापूर म.ए. समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ. अरविंद पाटील यांचे नाव कोल्हापुरात जाहीर केले. 

पत्रकारांशी बोलताना एन. डी. म्हणाले,  आ. पाटील यांनाच उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले होते. पण, खानापुरात एका गटाने मतदारात संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे खानापूरची उमेदवारी जाहीर करीत असून मराठी भाषिकांनी आ. अरविंद पाटील यांच्या पाठीशी राहावे. बेळगावातील वाद संपवून उद्या तेथील उमेदवारीही जाहीर केल्या जातील, जे लोक संभ्रम निर्माण करीत आहेत, त्यांनी लोकांची दिशाभूल थांबवावी. 

बुधवारी दुपारी प्रा. डॉ. एन. डी.पाटील यांच्या निवासस्थानी आ. पाटील यांनी मध्यवर्ती समितीच्या सूचनेवरून खानापूर तालुका समिती कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांसह भेट घेतली. त्यावेळी उमेदवारी घोषित करून डॉ. पाटील म्हणाले, सीमा खटल्यात सीमावायांची लोकेच्छा दाखवून देण्यासाठी यावेळी बेळगाव आणि खानापूर येथील चारही जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. त्याचा विचार करून यावेळी मागच्यासारखी फंदफितुरी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. उमेदवार निवडीसाठी मध्यवर्ती समितीने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती. घटक समित्यांनी आपले उमेदवार निश्‍चित करून उमेदवाराचे नाव मध्यवर्तीकडे पाठवून द्यावे, असे ठरले होते. मात्र, माजी आ. दिगंबर पाटील यांनी मध्यवर्तीचा निर्णय अमान्य करून परस्पर उमेदवारी जाहीर केली.