Thu, Nov 15, 2018 22:15होमपेज › Belgaon › खानापूर तालुक्यातील अतिथी शिक्षकांना वाली कोण?

खानापूर तालुक्यातील अतिथी शिक्षकांना वाली कोण?

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 8:01PM

बुकमार्क करा
खानापूर : वासुदेव चौगुले

प्राथमिक शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीएड पदवीचे शिक्षण घेतले खरे. मात्र मराठी शाळांच्या जीवावर उठलेल्या सरकारने शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष केल्याने हंगामी तत्वावर अतिथी शिक्षक म्हणून सेवा बजाविणार्‍या शिक्षकांची शासनासह अधिकारीवर्गानेही पगाराविना क्रुर थट्टाच चालविली आहे. खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात हलाखीच्या परिस्थितीत विद्यादानाचे कार्य करणारे जवळपास शंभरहून अधिक अतिथी शिक्षक सात महिने पगारापासून वंचित राहिले आहेत.

सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. शिक्षकभरती होईपर्यंत या रिक्त जागांवर हंगामी तत्वावर अतिथी शिक्षकांची नेमणूक करुन कसेतरी शिक्षणाचे घोडे पुढे दामटण्याचा खटाटोप सुरु आहे. मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळांमध्ये हे शिक्षक प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांचा सर्वाधिक भरणा आहे. दुर्गम भागातील अनेक कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. अशा अनेक शाळांतील शिक्षकांची बदली वा सेवानिवृत्ती झाल्याने त्याजागी अतिथी शिक्षकांना नेमण्यात आले आहे. अध्यापनासह माध्यान्ह आहार व अन्य शासकीय कामकाजासाठी अतिथी शिक्षकांना राबवून घेतले जात आहे.

असे असतानाही तब्बल सात महिन्यापासून त्यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याने ते सेवा बंद करण्याच्या विचारात आहेत. असे झाले तर कित्येक एक शिक्षकी शाळांना कुलूप लावण्याची नामुष्की शिक्षणखात्यावर ओढवू शकते. मात्र दुर्गम भागातील शाळा सुधारणा समित्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अतिथी शिक्षकांना  शाळा सोडून जाऊ नका. तुम्ही गेला तर आमच्या मुलांनी काय करावे. अशी भावनिक गळ घालण्यात येत असल्याने सदर शिक्षकांचाही नाईलाज झाला आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते कसेबसे पदरमोड करुन आपली  गुजरान करत आहेत. पण असे किती दिवस पगाराविना काढावे लागणार, हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

दुर्गम भागातील  शाळांवर जाण्यासाठी बसची सोय  नसल्याने स्वतःची दुचाकी घेऊन शाळेला जावे लागते. त्यासाठी खरेतर साडेसात हजार रु.  अत्यल्प मानधन आहे.  तेही वेळेत मिळत नसल्याने पगारासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे अतिथी शिक्षकांना अनेकवेळा उंबरे झिजवावे लागत आहेत.