Mon, Jul 15, 2019 23:55होमपेज › Belgaon › खानापूरचे नगराध्यक्ष अजीम तेलगींचे निधन

खानापूरचे नगराध्यक्ष अजीम तेलगींचे निधन

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:29AMखानापूर : प्रतिनिधी

खानापूरचे नगराध्यक्ष अजीम ऊर्फ अब्दुलअजीम लाडसाब तेलगी (वय 58) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास निधन झाले. नगरसेवकांशी आपल्या कक्षामध्ये ते चर्चा करत बसले असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्‍का बसला. त्यांना दवाखान्यात पोहचेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तीन महिन्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने पंधरा दिवस दवाखान्यात दाखल व्हावे लागले होते. उपचार व शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या महिन्यापासून ते नगर पंचायतीच्या कामकाजात सहभाग घेऊ लागले. 

नेहमीप्रमाणे उपनगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक रफीक वारीमनी, विश्‍वास हुबळीकर आदींसह आपल्या कक्षात चर्चा करत असताना छातीत कळ येऊन अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी सहकार्‍यांना सांगितले.

तेलगी यांनी नेहमीच्या औषधासाठी आपल्याला घराकडे न्या, असे सांगितल्याने विद्यानगर येथील घरी नेण्यात आले. पण  त्यांची स्थिती आणखीच बिघडल्याने तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

गेल्या अडीच वर्षापासून ते खानापूरच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. वर्षभरापूर्वी त्यांचा भाऊ आणि बनावट मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुलकरीम तेलगी याचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले होते.

अजीम तेलगी यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. रात्री 9 वा. सामूहिक नमाजपठण झाल्यानंतर विधीवत रितीने दफनविधी पार पडला. राजकिय, सामाजिक व क्रिडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.