Wed, Mar 27, 2019 05:58होमपेज › Belgaon › कारवार समुद्र किनारी अनोखे वस्तूसंग्रहालय

कारवार समुद्र किनारी अनोखे वस्तूसंग्रहालय

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:34PMखानापूर : वासुदेव चौगुले

आादिवासी समाजाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रतिकांचे जतन करण्यासाठी कर्नाटकाचे पर्यटन खाते व पुराभिलेख संचालनालयाने कारवार समुद्र किनारी कायमस्वरुपी वस्तूसंग्रहालय व उद्यान साकारले आहे. आदिवासी समाजाची जीवनशैली या वस्तूंमधून दिसते.

पालकमंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या उपस्थितीत वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. कारवार  जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांना या वस्तूसंग्रहालयामुळे आदिवासी लोकजीवनाची अनुभूती घेता येईल. विदेशी पर्यटकांसाठीही हे संग्रहालय आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

जोयडा तालुक्यातील तेरेगाळी गावच्या बम्मू फोंडे या  तरुणाने संग्रह केलेल्या गवळी समाजाशी संबंधित वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. याशिवा सिद्धी, कुणबी, आदीवासी समाजाचे लोकजीवन समृद्ध करणार्‍या वस्तू पाहायला मिळणार आहेत.

पशुपालन करणारा धनगर-गवळी समाज आपल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची एकोप्याने जपणूक करण्यास प्राधान्य देतो. या समाजाचा पारंपरिक वारसा जपणार्‍या अनेक वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या वस्तूंचे जतन व्हावे, तसेच त्यांचा इतिहास जागतिक पातळीवर पोहचावा, या हेतूने बम्मू या धनगर गवळी समाजातील युवकाने दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला.

उपक्रमासाठी जोयडा तालुक्यातील धनगर गवळी युवा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, राज्य संघटनेचे सिद्धू थोरत, धाकलू शळके, रामू येडगे, सावित्री पावणे यांनी सहकार्य केले आहे.

लोक सांस्कृतिक ठेव्याचे जतन

कारवार जिल्ह्यात आदिवासींचे मोठे प्रमाण आहे. त्यांच्या लोककला, व्यवहार आणि लोकजीवनाची माहिती इतरांना मिळावी, तसेच त्यांच्या वारशाचे जतन व्हावे, या उद्देशाने या उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये घोंगडं, पागोटं, लंगोटी, चोळी यांसह महिला व पुरुषांच्या कानातील व गळ्यातील विविध प्रकारची पारंपरिक फुले, माळा, दसरा-दिवाळीतील नृत्यासाठी वापरण्यात येणारा झगा, पायात बांधले जाणारे घुंगरु, डफ, ढोल, ताळा, वेताची काठी, ताक व खवा करण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची भांडी, दुडका, वळकी, लग्नकार्य व धार्मिक समारंभात वापरण्यात येणारे साहित्य आदींचा संग्रहालयात समावेश आहे.