Tue, Jul 23, 2019 10:33होमपेज › Belgaon › उमेदवार आपल्याच मतापासून ‘वंचित’

उमेदवार आपल्याच मतापासून ‘वंचित’

Published On: Apr 21 2018 8:24AM | Last Updated: Apr 21 2018 8:24AMबेळगाव :  प्रतिनिधी

निवडणुकीमध्ये एकेक मत उमेदवाराचे भविष्य बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. एकेक मत मिळविण्यासाठी मतदारांच्या दारापर्यंत अनेक उमेदवारांना धाव घ्यावी लागते. काही उमेदवार तर हिशोब नाही इतका पैसा मतदारांना ओतण्याचे काम करतात. या परिस्थितीमध्ये काही उमेदवारांना मात्र स्वतःचे मतदान करण्याची सुध्दा परिस्थिती निर्माण होत नाही. त्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यामध्ये 7 उमेदवारांचा समावेश आहे. 

आपले राजकीय भविष्य पक्षाच्या उमेदवारीवर घडविण्यासाठी अनेक उमेदवार  निवडणुकीद्वारे आपली सत्वपरीक्षा घेत आहेत. 

सतीश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी यांचे मतदान गोकाकमध्ये आहे. शशिकला जोल्‍ले यांचे एकसंबामध्ये आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मतदान बेळगाव उत्तरमध्ये आहे. संजय पाटील यांचे मतदान बेळगाव दक्षिणमध्ये आहे. एम. व्ही. लक्ष्मीनारायण यांचे मतदान तुरमूरमध्ये आहे तर अंजली निंबाळकर यांचे मतदान बंगळूरमध्ये आहे. 

बेळगाव जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये जारकीहोळी कुटुंबियांचेे  नाव प्रसिध्द आहे. या कुटुंबातील प्रमुख तीन आमदार रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी या तिघांचेही मतदान गोकाक मतदाक्षेत्रामध्ये आहे. ही वस्तूस्थिती असली तरी सतीश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील वेगळ्या मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःचे मतदान करणेसुध्दा कठीण होवून बसलेले आहे. 

सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी या राखीव मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत तर भालचंद्र जारकीहोळी हे आरभावी मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. हे दोघेही उमेदवार दोन दोन वेळा त्याच मतदार संघातून निवडणूक लढवित असले तरी त्यांनी आपले मतदान स्थलांतरीत करून घेतलेले दिसून येत नाही. त्याप्रमाणे त्यांनी मतदान बदलून घेण्याचे इच्छाही दर्शविलेली नाही.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदार संघातून आ. शशिकला जोल्‍ले निवडणूक लढवित असल्या तरी त्यांचे मतदान एकसंबामध्ये आहे. चिकोडी सदलगा मतदार संघातील उमेदवाराला त्यांना मतदान करता येणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढविणार्‍या लक्ष्मी हेब्बाळकर यांंना बेळगाव उत्तरमधील उमेदवाराला मतदान करता येणार आहे. भाजप उमेदवार संजय पाटील यांना बेळगाव दक्षिणमधील उमेदवाराला मतदान करता येणार आहे. एम. डी. लक्ष्मीनारायण हे बेळगाव दक्षिणमधून निवडणूक लढवित असल्याने त्यांचे मतदान तुमकूरमध्ये असल्याने ते बजावता येणे कठीण आहे. 

खानापूरमधील काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचे मतदान बंगळूरमधील हेब्बाळमध्ये असले तरी त्यांना स्वतःचे मतदान करता येणे कठीण आहे. चिकोडी सदलगा मतदार संघातून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी व भाजपचे उमेदवार आण्णासाहेब जोल्‍ले, अथणीमधून निवडणूक लढविणार लक्ष्मण सवदी, कागवाड उगारखुर्दमधून निवडणूक लढविणारे भरमगौडा कागे, कुडचीमधून पी. राजीव, रायबागमधून दुर्योधन ऐहोळे, हुक्केरीमधून उमेश कत्ती, गोकाकमधून रमेश जारकीहोळी, बेळगाव उत्तरमधून फिरोज सेठ, बेळगाव दक्षिणमधून अभय पाटील, खानापूरमधून अरविंद पाटील, कित्तूरमधून डी. बी. इनामदार, बैलहोंगलमधून डॉ. विश्‍वनाथ पाटील, सौंदत्तीमधून आनंद मामनी व रामदुर्गमधून अशोक पट्टण यांना आपले मत बजावण्याचा हक्‍क प्राप्त झालेला आहे.

Tags : Karnataka, Election, Voter, Candidates,