Sat, Jul 20, 2019 09:00होमपेज › Belgaon › कर्नाटक शक्‍तिशाली बनविणार : मुख्यमंत्री

कर्नाटक शक्‍तिशाली बनविणार : मुख्यमंत्री

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 11:47PM

बुकमार्क करा

गोकाक : वार्ताहर

कर्नाटक प्रगतशील आणि शक्‍तिशाली राज्य बनिवणे हे काँग्रेस सरकारचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. महर्षि वाल्मिकी क्रीडांगणावर तालुकास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करून ते बोलत होते. 

गोकाक विधानसभा क्षेत्रातील 110 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी चालना दिली. सरकारी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. सिध्दरामय्या यांनी 2018 च्या निवडणुकीतून राज्यातील जनतेला शुभसंदेश देऊ, अशी ग्वाही दिली.

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला किमान 10 ते 12 जागा निश्‍चितपणे मिळतील, अशी खात्री त्यांंनी व्यक्‍त केली. भाजप विकासावर नाही तर हिंदुत्वावर मत मागते. भारत हिंदू राष्ट्र करणे हा त्यांचा एकच उद्देश आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील म्हणाले, राज्यात पाटबंधारे योजनांवर दरवर्षी 10 हजार कोटीप्रमाणे 50 हजार कोटी शासनाने खर्च केले आहेत. यातील बहुतांश निधी उत्तर कर्नाटकासाठी दिला आहे. भाजपा सत्ताकाळात फक्त 18 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

जिल्ह्यात 10 ते 12 उमेदवार विजयी करून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले लक्ष्य सर्वांच्या साथीने पूर्ण करू. सतीश जारकीहोळी, खा. प्रकाश हुक्केरी, अशोक पट्टण आदींचे सहकार्य असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सहकार आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी, उद्योजक लखन जारकीहोळी, बोरगावचे रावसाहेब पाटील, जि.पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, अनंत चोप्रा, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख नजारे, ग्रामीण शाखा अध्यक्ष मारुती निर्वाणी, कामगार नेते हंबीरराव पाटील उपस्थित होते. मेळाव्यास 10 हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.  विनय नावलगत्ती यांनी स्वागत केले.