Tue, Mar 19, 2019 09:45होमपेज › Belgaon › निपाणीत काँग्रेस-भाजपमध्ये अस्तित्त्वाची लढाई

निपाणीत काँग्रेस-भाजपमध्ये अस्तित्त्वाची लढाई

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 18 2018 8:56PMनिपाणी : विठ्ठल नाईक

कार्यकर्त्यांना उमेदवारी निश्‍चितेची लागलेली प्रतीक्षा संपली असून आता खर्‍याअर्थाने निवडणुकीला रंग चढला आहे. निपाणी मतदारसंघात भाजपतर्फे यापूर्वीच पहिल्या यादीत विद्यमान आमदार शशिकला जोल्‍ले यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब झाला. काँग्रेस उमेदवारीबाबत अनेक तर्क वितर्कांना पूर्णविराम मिळत माजी आ. काकासाहेब पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये अस्तित्त्वाची लढाई असून दोन्ही पक्ष विजयाचा विश्‍वास दाखवित आहेत.

अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या निपाणी तालुका निर्मितीलाही प्रचंड जनरेट्यामुळे यश प्राप्‍त झाले आहे. निपाणी मतदारसंघात पहिल्या महिला आमदार म्हणून शशिकला जोल्‍ले यांनी नाव कोरले. आता निपाणी तालुका घोषणेनंतर तालुक्याचा पहिला आमदार होण्याचा मान कोणाला मिळणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आमदार जोल्‍ले यांनी राज्यात विरोधी सरकार असताना मतदारसंघात राबविलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप विजयाचा विश्‍वास व्यक्‍त करण्यात येत आहे.

माजी आ. काकासाहेब पाटील यांनी तत्कालीन आमदारकीच्या कालखंडात शाश्‍वत विकासकामे राबवून वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण करत नागरिकांना दिलासा दिला आहे. काळम्मावाडी करार, रेल्वेमार्गासाठी वारंवार पाठपुरावा, औद्योगिक वसाहतीसाठी केलेले प्रयत्न आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस गोटातून काँग्रेस विजयाचा विश्‍वास व्यक्‍त होत आहे. 

माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी गतवेळी आ. शशिकला जोल्‍ले यांना पाठिंबा दर्शविल्याने आ. जोल्‍लेंचा मार्ग सुकर बनला होता. पण यंदा प्रा. जोशींनी जोल्‍लेंच्या विरोधात भूमिका घेतली असून काँग्रेसप्रणित कार्यक्रमातील सहभागातून माजी आ. काकासाहेब पाटील यांना प्रा. जोशींचे बळ मिळाले आहे.  आता फोडाफोडीचे राजकारण सुरु असून ताकद दाखवून देण्यासाठी हालचाली गतिमान दिसत आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेवेळी जुन्या सदलगा मतदारसंघाची विभागणी करुन 13 गावांचा समावेश निपाणी मतदारसंघात करण्यात आला आहे. जुन्या सदलगा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी यांचा बालेकिल्‍ला असलेल्या गावात काँग्रेसचे वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे आ. जोल्‍लेंनी संबंधित गावात अधिक लक्ष केंद्रित करुन आखणी सुरु केल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:च्या पक्षाचा गवगवा मांडत असल्याचे चित्र दिसत आहे. निपाणी मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्‍कर होणार, असे चित्र पाहावयास मिळत आहे.