Sat, Apr 20, 2019 17:58होमपेज › Belgaon › हेब्बाळकर, निंबाळकर, काकासाहेब, श्रीमंत पाटील, हुक्केरी, ए. बी. पाटलांना उमेदवारी

हेब्बाळकर, निंबाळकर, काकासाहेब, श्रीमंत पाटील, हुक्केरी, ए. बी. पाटलांना उमेदवारी

Published On: Apr 16 2018 1:38AM | Last Updated: Apr 16 2018 1:38AMनवी दिल्ली, बंगळूर ः प्रतिनिधी

तीव्र अंतर्गत मतभेद मिटवून काँग्रेसने विधानसभेसाठी अखेर रविवारी रात्री 219 उमेदवारांची यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील सार्‍या संभाव्य उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. बेळगाव दक्षिणमधून विणकर नेते एम. डी. लक्ष्मीनारायण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील एकूण 18 मतदारसंघांपैकी 17 मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. फक्त कित्तूर मतदारसंघ प्रलंबित ठेवण्यात आला आहे. पालकमंत्री रमेश जारकिहोळी, सतीश जारकिहोळी यांच्यासह कर्नाटक प्रदेश काँग्रेस महिला समिती अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, बालभवन अध्यक्ष डॉ. अंजली निंबाळकर, फिरोझ सेठ, काकासाहेब पाटील, गणेश हुक्केरी, श्रीमंत पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय हुक्केरीतून ए. बी. पाटील आणि रायबागमधून  प्रदीपकुमार माळगी यांची नावे जाहीर झाली आहेत. काँग्रेसने रविवारी 224 पैकी 219 मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. पाच मतदारसंघांबाबत अजूनही सिद्धरामय्या, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्वर यांच्यात मतैक्य न झाल्याने या मतदारसंघांसाठी नावांची घोषणा नंतर होईल. सर्व 224 उमेदवारांची घोषणा एकाच वेळी करण्याचे काँग्रेसचे नियोजन होते.