Wed, Jul 17, 2019 20:32होमपेज › Belgaon › वीरशैव-लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा हवा

वीरशैव-लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा हवा

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMबंगळूर : पीटीआय
वीरशैव-लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक हा दर्जा द्यावा, असा निर्णय कर्नाटक मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला. तशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देताना कायदामंत्री टी. बी. जयचंद्र म्हणाले, लिंगायत व वीरशैव-लिंगायतांना (बसवेश्‍वरांचे तत्त्वज्ञान मानणारे) धार्मिक अल्पसंख्याक हा दर्जा देण्याचा निर्णय झाला. लिंगायत व वीरशैव लिंगायत यांना कर्नाटक राज्य अल्पसंख्याक कायद्याच्या कलम 2 (डी) अनुसार धार्मिक अल्पसंख्याक हा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

इतर समाजांवर प्रभाव नाही

वीरशैव-लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा परिणाम इतर धार्मिक अल्पसंख्याकांवर होणार नाही, अशी ग्वाहीही कायदामंत्र्यांनी दिली.

निवडणुकीआधी निर्णय

लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास अनेक मंत्र्यांचा विरोध होता. खुद्द लिंगायत मंत्र्यांमध्येही मतभेद होते. मात्र, आगामी निवडणुकीत लिंगायतांची मते आपल्या बाजूनेच राहावीत, यासाठी हा निर्णय सिद्धरामय्या सरकारने घेतल्याचे मानले जाते. न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास यांच्या समितीने राज्य सरकारला 2 मार्चला अहवाल दिला होता. लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक मानावे, अशी शिफारस त्यात करण्यात आली होती. मात्र, लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा किंवा धार्मिक अल्पसंख्याक हा दर्जा दिल्यास वीरशैवांनाही स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, अशी मागणी वीरशैव पंथाच्या स्वामींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे या निर्णयाला वीरशैव पंथाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीतही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.