होमपेज › Belgaon › आज कोण हसणार, कोण रडणार..?

आज कोण हसणार, कोण रडणार..?

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 14 2018 8:43PMमतदानादिवशी त्या पक्ष्यानं राज्यात फिरून बित्तंबातमी आणली होती. पण बदलत्या समीकरणांमुळं  काही वेगळं घडेल, या उत्सुकतेपोटी त्या पक्ष्यानं आपला मुक्‍काम दोन दिवस वाढवला. राज्य पुन्हा पिंजून काढायचं आणि राजधानीत मुक्‍कामाला यायचं त्यानं ठरवलं. त्यानं प्रथम कुमारांच्या घरट्याभोवती घिरट्या घातल्या.  

‘त्रिशंकु’ स्थिती येण्याची शक्यता आणि मतदानोत्तर जनमत चाचणी पाहता काँग्रेस आणि भाजपनं ‘डी..के’ योजनेवर काम सुरू केलं आहे, अशी वार्ता कुमारांच्या निवासस्थानी येऊन धडकली. पण कुमार घरी थोडेच होते, ते तर भुर्रकन उडून थेट सिंगापूरला जाऊन पोहोचले. पण त्यांचे डोळे घारीचे. घार उडते आकाशी, परि तिचे लक्ष पिलापाशी, या उक्‍तीनुसार ते देहानं सिंगापुरी असले तरी मन मात्र मायराज्यात - कर्नाटकातच आहे. सर्व बातम्या, घडामोडी त्यांना त्यांचे कार्यकर्ते पुरवत आहेत. सिध्दय्यांनी आपला डाव खेळला आहे. तसं आप्पाही काही कमी नाहीत. त्यांनीही आपल्या जिंकून येण्याच्या जागा 15 ते 20 नं कमी असल्याचं सांगून खेळी खेळली आहे. आता ते म्हणतात आमची झेप 130 पर्यंतची!

सिध्दय्या आणि आप्पा यांची बदललेली भूमिका आश्चर्यकारक असली तरी ती अनपेक्षित नाही, असं म्हणायला हरकत नाही. कुमारांच्या देवांनी सावध पवित्रा घेताना कोणाकडून आधी आवतण येतं, याची प्रतीक्षा चालवलेली आहे. तसं कुमार आणि देव बेरकी हं. संधिसाधूपणाचं आदर्श उदाहरण म्हणजे ही जोडी. महाराष्ट्रात चंद्र नावात असलेला नेता आणि हे दोघं, यात खूप साम्य आहे. सत्ता हाती आली की स्वार्थ त्यांच्यावर हावी होतो. मग पुढचं पुढं पाहू, असं त्यांचं धोरण असतं. 

सिध्दरामय्या भलते चलाख आहेत. देशातील इतर राज्यांतील निवडणुकांची स्थिती-गती त्यांनी रात्रभर नजरेखाली घातल्यानं त्यांचे डोळे थोडे तारवटलेले आणि किंचित लालसर किनार होती. यावरून त्यांना जागरण झालं होतं. नजीकच्या गोव्यात काय घडलं होतं. काँगे्रस मोठा पक्ष ठरला तरी कमळाबाईनं हुशारी केली आणि भाजप सत्तेवर आला. आज कर्नाटकात न जाणो तशी स्थिती ओढवली तर गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर पाणी सोडायला तयार असल्याचं सांगून इतरांच्या भुवया उंचावायला लावल्या आहेत. सिध्दय्यांचा माहेरचा पक्ष निजदच. सिध्दय्यांचा निर्णय युवराजांनाही चकित करणारा आहे. पण त्यांनीही तातडीनं काही वक्‍तव्य वा सिध्दय्यांना सल्‍ला दिलेला नाही. 

इकडं कमळाबाईही सावध आहे. त्यांनीही इतरांना मधाचं बोट लावून चुचकारण्याचा छुपा प्रयत्न चालवलेला आहे. निकाला काहीही लागला तरी भाजप आणि काँग्रेसला  निजदच्या आरीभोवती फिरायला लागणार, अशी चिन्हं दिसतात. यामुळं आज कोण हसणार, कोण रडणार हे दुपारच्या आत स्पष्ट होणार आहे. मगच खरा धुरळा उडणार आणि मतदार फक्‍त पाहत बसणार...पाच वर्षं. एवढंच त्याच्या हाती! पुन्हा भरारी घ्याची वेळ आली तर पाहू, सध्या निघालो सुटीवर....