मी एक आहे पक्षी
फिरून आलो राज्यात
उत्साह, कुतूहल सर्वत्र
मतदान चाले जोरात...
म्हैसूरमध्ये दिसले खास
रेशमी साड्या नेसून बेस
केली त्यांनी गर्दी माप
‘पिंक’मध्ये भारी रुबाब ...
राजधानीचा रंगच न्यारा
आय-टी कामगार गायब होता
उमेदवारांची चाले कसरत
शोधून आणती त्यांना थेट...
चामुंडेश्वरी दिसले काय
जो तो मतदाना जाय
रस्त्यावरली ट्रॅफिक जाम
मिळेना वाट धावाधाव...
बदामीत कसला जोर
सिध्दय्यांचा दिसला शोर
कमळाभोवती असे मोहोळ
बुचकळ्यात सारे खोल...
लगीनघाई आहे संपली
पैजा लागती गल्लोगल्ली
सट्टाबाजारी दिसे तेजी
कोण कुणावर मारेल बाजी?
शिकारीपुरात एकच नाव
हातात कमळ, काय राव
शेतकरी महिला जैसे थे
म्हणे नशीब पाहते आहे...
आश्वासने खूप दिधली
उडवले पैसे, दिली बाटली
कोण येणार मदतीस आता
उमेदवारा सतावते चिंता...
प्रचार शमला, कत्तलरात्र
सारे जागत होते रात्र
तरीही सापडली माया
पोलिसांचा पडतो छापा...
सभा, रॅलीच्या खाणाखुणा
दिसत होत्या ग्रामीण भागा
या सार्यावरून आता
अंदाज बांधत होते पाहा...
चिकमंगळूर नाव प्रख्यात
उमेदवारही आहेत ख्यात
रस्सीखेच दिसली तिथे
कोण येणार आहे कोडे?
शिमोग्यात संघर्ष जुना
ईश्वराहाती कमळ पाहा
हाताचीही शक्ती भारी
निजदही आव्हान देई...
रामनगरचा अनभिषिक्त स्वामी
मतांची त्याला न कमी
किती घेणार औत्सुक्याचे
तरीही कमळ-हात झुंजे...
हुबळी-धारवाड पेढ्यांची पेठ
आहेत विख्यात मंदिरे-मठ
कमळाविरुध्द लढतो हात
अद्याप आहे सारेच गूढ...
हल्याळमध्ये मक्तेदारी
लढत मात्र आहे तिरंगी
आयाराम टक्कर देती
नडेल त्यांना विश्वास अति...
निपाणीची लढत न्यारी
एकमेकास सारे भारी
दिग्गजांनी केला प्रचार
लक्ष एक, कुणाची हार!
चिकोडीचा कौल कुणा?
निकाल आहे ठरलेला
पिता-पुत्रांची जागीर आहे
कमळाचाही सुवास आहे...
खानापुरात लढत तिहेरी
अधिकृत विरुध्द बंडखोरी
संभ्रमात दिसली जनता
साथ दिली का कमळाला?
कोण घेणार पाहायचे आता
बेळगावचा भुईकोट किल्ला
पेटून उठला शिव-मावळा
अमावसला होईलपौर्णिमा...
आता माझा निष्कर्ष ऐका
दिग्गजांचा उडेल धुव्वा
‘त्रिशंकु’ची आहे शंका
15 रोजी बसेल धक्का!