Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Belgaon › विजयाची खात्री नसल्याने तयारी शून्य

विजयाची खात्री नसल्याने तयारी शून्य

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 14 2018 9:25PMबेळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील सार्‍याच मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवार रिंगणात राहिल्याने कुणालाही आपल्या विजयाची 100 टक्के खात्री देता येत नाही. परिणामी निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्रीपर्यंत विजयोत्सवांची तयारी शून्य होती. निकाल लागल्यानंतरच तयारी करून आणि विजयोत्सव करु, याच मानसिकतेत बहुतेक उमेदवार आहेत.

यंदा राज्यभरात चुरशीने मतदान झाले आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामुळे माझा उमेदवार नक्कीच निवडणू येईल असे म्हणणारे कार्यकर्तेही थंड बसले आहेत. एकंदरीत निकाल निश्‍चित नसल्याने सारेच संभ्रमावस्थेत आहेत.

महिनाभरापासून राज्यात अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. राज्यात बेळगाव जिल्ह्याला मानाचे स्थान आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निकालावर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघातून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षांने प्रयत्न केले आहेत. मात्र, विजयाची कोणालाच खात्री नसल्याने जल्‍लोषाची तयारीही झालेली नाही. मगळवारी निकाल लागल्यानंतरच जल्लोषाची तयारी केली जाणार असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. 

बेळगाव ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर मतदारसंघात काँग्रेस, भाजप, निजद या राष्ट्रीय पक्षांना समितीने टक्कर दिली आहे. यामुळे यंदा कोणता उमेदवार निवडून येईल हे सांगता येत नाही. चारही मतदार संघात प्रत्येक पक्षाने तगडे उमेदवार दिले आहेत. यामुळे अगदी काही मतांच्याच फरकाने उमेदवार निवडूण येईल,  अशी चिन्हे दिसत आहेत. 

शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक उमेदवार व कार्यकर्त्यांनी रविवारी व सोमवारी विश्रांती घेतली. मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष पहायला मिळणार आहे. मात्र, सद्या तरी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी चुप्पी साधली आहे.