Wed, Jun 03, 2020 08:51होमपेज › Belgaon › निवडणुकीनंतर कवित्व हितसंबंधाचे

निवडणुकीनंतर कवित्व हितसंबंधाचे

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 14 2018 8:55PMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणुकीनंतर नेत्यांच्या सोयीस्कर भूमिका आणि सोयरिकी चव्हाट्यावर येत आहेत. स्वकीय उमेवारांना अडचणीत आणण्यासाठी विरोधी उमेदवारांशी संधान बांधून केलेल्या अर्थपूर्ण घडामोडी उघड होत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात निवडणुकीनंतरचे कवित्व समोर आले आहे.

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने अनेक ठिकाणी निकाल फिरविण्यासाठी नेत्यांनी कसरती केल्या आहेत. काहींना पक्षातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी डोईजड ठरू शकणार्‍या उमेदवारांना निवडणुकीच्या फडातच दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. परिणामी कोणत्याही उमेदवाराला विजयाची खात्री देणे अवघड बनले आहे. 

जिल्ह्यातील सार्‍याच मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढली आहे. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतविभागणीचा धोका सार्‍यांनाच सोसावा लागण्याची भीती आहे. यासाठी अनेकांनी विरोधी गटातील असंतुष्ठांना हाताशी धरून दुसर्‍या गटात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला गेला. पक्षातंर्गत प्रवाह-अंर्तप्रवाह लक्षात घेऊन डाव-प्रतिडाव आखण्यात आले. याचा लाभ उमेदवारांना कितपत होणार, हे 15 रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील लढती तुल्यबळ होत्या. सारेच उमेदवार सरस असल्याने विजयासाठी काही उमेदवारांनी वाकड्या वाटा पकडत मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी लाखो रुपयाचा खेळ झाल्याची माहिती कार्यकर्त्यांतून देण्यात आली. मते विकत घेण्यासाठी एका मताला हजार ते पाचशेहे रुपयाचे वाटप केले. यामध्ये काही नेत्यांनी डल्ला मारुन आपली कमाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशा नेत्यांची निवडणुकीत चांदी झाली .

अटीतटीच्या लढतीच्या ठिकाणी काही असंतुष्ट नेत्यांनी विरोधी उमेदवाराला मतदान करण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना बजावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. राज्यातील एका बड्या नेत्याच्या पत्नीने जिल्ह्यातील एका उमेदवाराला पाडण्यासाठी भलीमोठी रक्‍कम खर्च केल्याची खुमासदार चर्चा सुरू आहे. 

बंडाचे निशाण उभे करत स्वाभिमानाचे आव्हान करणारा एक उमेदवार निवडणुकीच्या रात्री एका बड्या उमेदवारांनी अर्थकरणातून मॅनेज झाल्याची माहिती कार्यकर्त्यांतून देण्यात आली. तर काहींनी तुमचे मत मला नको मात्र, तुमच्याच उमेदवाराला करण्याची सूचना केल्याची कुजबूज रंगत आहे.