Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Belgaon › सीमा प्रश्‍नाबाबत बांधिलकी दाखवा

सीमा प्रश्‍नाबाबत बांधिलकी दाखवा

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:25AMबेळगाव : प्रतिनिधी

गेली 67 वर्षे सीमावासीय जनता महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढत आहे. या लढ्यातील एक सच्चा नेता आपल्या आशीर्वादाने विजयी झाला, तर विधानसभेत आपण भगवा झेंडा नक्‍की फडकवू. त्यामुळे सीमा प्रश्‍नाशी बांधील राहा आणि मध्यवर्ती समितीने निवडलेल्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. 

अनगोळमध्ये मध्यवर्ती समिती उमेदवारांची प्रचारसभा झाली. सभेत डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, निवडणूक हा लोकलढ्याचा एक भाग आहे. त्यातून लोकेच्छा दाखवण्याची संधी असते. आतापर्यंत सीमावासीयांच्या मनात महाराष्ट्रात जाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. ती लोकेच्छा पुन्हा एकदा दाखवा.

नेत्यांची लढ्याशी बांधिलकी आणि योगदान लक्षात घेऊन उमेदवारांची निवड झाली आहे. त्याबद्दल दुमत नाही. लढा सर्वोच्च न्यायालयात असताना लोकेच्छा हा घटक सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. भौगोलिक सलगता, भाषिकबहुलता आणि खेडे हा घटक ही चौसूत्री राज्य पुनर्रचना करताना अवलंबिली गेली; पण सीमाभागाबाबत भौगोलिक सलगता आणि भाषिकबहुलता यांना तिलांजली मिळाली. ती चूक प्रशासनाने सुधारण्याची गरज आहे. म्हणून आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असेही डॉ. पाटील म्हणाले.

कोल्हापूरच्या माजी महौपार हसिना फरास यांनीही सभेला मार्गदर्शन केले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन अ‍ॅड. राम आपटे यांनी, दीपप्रज्वलन माजी महापौर संज्योत बांदेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी अनगोळ विभाग समिती अध्यक्ष बी. ओ. येतोजी होते. 

उमेदवार प्रकाश मरगाळे, प्राचार्य व्ही. ए. पाटील, दिनेश ओऊळकर,  सुभाष ओऊळकर, नगरसेवक विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, रघुनाथ बांडगी, बाबुराव ताशीलदार, रमेश पाटील, अमित हलगेकर, उमेश भांदुर्गे, शिवाजी पाटील, राजू हलगेकर होते.