Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Belgaon › केएसआरपी केंद्र टाकतेय कात 

केएसआरपी केंद्र टाकतेय कात 

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 04 2017 9:50PM

बुकमार्क करा

बेळगाव : हिरामणी कंग्राळकर

एपीएमसी मार्गावरील कर्नाटक राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या (केएसआरपी) विकासाला चालना देण्यात आली आहे. कित्येक वर्षांपासून विकासापासून दूर असणारे एपीएमसी पोलिस कवायत मैदानासह परिसराने कात टाकली आहे. 

शहरासह परिसरात संरक्षण विभागाशी संबंधित असणार्‍या विविध प्र्रशिक्षण केंद्रांमुळे बेळगावचे नाव देशभरात प्रसिध्द आहे. मराठा लाईट इन्फंट्रीमधील कमांडो प्रशिक्षण केंद्रामुळे देशाच्या संरक्षण विभागात बेळगाव अग्रस्थानी आहे. सांबरा   एअरफोर्स प्रशिक्षण केंद्राला मोठा इतिहास आहे. आता एपीएमसी येथील केएसआरपी प्र्रशिक्षण केंद्रामुळे एपीएमसी भागालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रशिक्षण केंंद्र सुरू होऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. प्रशिक्षण भागाचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. काही दिवसांपासून येथे सुरू असणार्‍या विकासकामांमुळे प्रशिक्षण केंद्र परिसराचे रूपडे पालटले आहे. परिसराची स्वच्छता करून निर्माण करण्यात येणारी हिरवळ लक्षवेधी ठरली आहे. 

या केंद्राची 38 एकर जागा आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी पोलिसांना  कवायत मैदान, प्रशिक्षण केंद्र कार्यालय, पोलिस निवासी इमारती बांधल्या आहेत. कित्येक वर्षा पासून या जागेचा विशेष वापर न झाल्याने परिसरात झाडेझुडपे वाढून मद्यपींसाठी व गुन्हेगारांसाठी मोकळी जागा मिळत होती. प्रशिक्षण केंद्र उभारल्यानंतर  जागेचा पोलिस प्रशासनाने योग्य तो उपयोग करण्यावर भर दिला आहे. परिसरातील खुरटी झुडपे हटवून परिसराचा विकास केला आहे. 

केंद्रात राज्यभरातील केएसआरपी विभागात निवड झालेल्या युवकांना प्रशिक्षण दिले जाते. 400 जणांना प्रशिक्षण देण्याची सोय आहे. दोन वर्षात दोन तुकड्यांना प्रशिक्षण दिले आहे. केएसआरपीच्या इतिहासात प्रथमच महिला प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 50 महिलांची पहिली तुकडी येथून प्रशिक्षण घेऊन सेवेत रुजू झाली आहे. 

सध्या केंद्राच्या माध्यमातून बंगळूर व हसन येथून आलेल्या प्रशिक्षणार्थींचा पासिंग आऊट परेडचा कार्यक्रम लावकरच होणार आहे. अनेक महनीय व्यक्तींची कार्यक्रमाला उपस्थिती  असणार आहे. या भागात वृक्षारोपण करून हिरवळ निर्माण कण्यात आली आहे. केंद्रासमोर लॉन व फुलझाडे लावून बगीचा फुलविण्यात आला आहे. यामुळे केंद्राच्या सौंदर्यात भर पडली आहे. प्रशिणार्थींच्या रोजच्या कवायती व परिसर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे. यामुळे एपीएमसी रस्त्याला झळाळी मिळाली आहे.