Thu, Jun 20, 2019 01:52होमपेज › Belgaon › नेत्यांच्या दौर्‍यांनी बेळगाव निघाले ढवळून

नेत्यांच्या दौर्‍यांनी बेळगाव निघाले ढवळून

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:15PMबेळगाव : प्रतिनिधी 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय नेत्यांबरोबर कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरातमधील नेते प्रचारासाठी उतरले असून काही नेत्यांनी बेळगावमध्ये तळ ठोकला आहे. यामुळे यंदाची निवडणुक चुरशीची होणार असल्याची चर्चा राज्यभर रंगत आहे. 

काँग्रेसने आपली सत्ता टिकविण्यासाठी आणि भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी  प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मात्र, तज्ञांच्या मतानुसार यंदाची विधानसभा त्रिशंकु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेस, भाजप व जेडीएस तीन्ही पक्षांनी आपले स्टार प्रचारक कामाला लावले आहेत. इतर राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री देखील प्रचाराला आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीला खास महत्व प्राप्त झाले आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यभरात 15 पेक्षा अधिक सभा घेतल्या आहेत.

बेळगाव जिल्ह्यात त्यांच्या 2 सभा झाल्या. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभा झाल्या. तसेच काँग्रेसतर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख, गुलामनबी आजाद  आदींनी जिल्ह्यात प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद  पवार, महाराष्ट्रातील शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, माजी मंत्री जयंत पाटील तसेच जेडीएसतर्फे अध्यक्ष एच. डी. देवेगौैडा, कुमारस्वामी व एमआयएमचे खा. असदद्दुद्दिन ओवेसी आदी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांच्या सभा पार पडल्या. 

निवडणुक मतदानाची प्रक्रिया 12  मे रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी दोन दिवस आगोदरच प्रचार थंडावणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. गावोगावी प्रचार, सभा, रॅलीला वेग आला आहे. 

महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी निपाणी परिसरात तळ ठोकला आहे. सीमेवरील महाराष्ट्रातील काही नेत्यांचा कर्नाटकातील मतदारसंघातील गावांवर प्रभाव आहे. त्यामुळे या नेत्यांच्या हालचाली देखील महत्वाच्या ठरत आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागात प्रचाराला येऊ नये, अशी मागणी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, पक्षाला महत्व देत महाराष्ट्रातील नेते प्रचाराला आले. त्याबद्दल रोष व्यक्त केला जात आहे.