होमपेज › Belgaon › निवडणुकीआधीच ‘गोवामेड’ दाखल

निवडणुकीआधीच ‘गोवामेड’ दाखल

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 9:05PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी वारेमाप खर्च करून प्रचाराची जंगी तयारी चालवली आहे. निवडणूक काळात तळीराम कार्यकत्यार्ंच्या वाढत्या मागणीची दक्षता घेऊन गोवामेड मद्याची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आल्याची चर्चा आहे. 

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून विविध प्रकारे प्रचाराचे काम जोमाने सुरू केले आहे. प्रचाराच्या निमित्ताने स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, मंदिर आणि देवस्थानांना देणग्या, विविध सणांच्या निमित्ताने विविध मंडळांना बक्षिसे आणि भेटवस्तू दिल्या गेल्या आहेत. 

निवडणुका तोंडावर आल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाला वेग येणार आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी मेजवान्या आयोजित केल्या जात आहेत. घड्याळे, कुकर, साड्या, गृहोपयोगी वस्तू तसेच विविध प्रकाराचे साहित्य देऊन मतदारांना आमिषे दाखविली जात आहेत. इच्छुक उमेदवार  प्रतिस्पर्धांच्या हालचालींवर डोळा ठेवून त्यांच्यावर मात करण्यासाठी कार्यकर्ते आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फंडे शोधत  आहेत. आचारसंहिता जारी झाल्यास होणारा खर्च निवडणूक आयोगाला दाखवावा लागणार आहे. याची खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे खर्च केला जात आहे. 

निवडणूक काळात कार्यकर्त्यार्ंबरोबर तळीराम समर्थकांमधून मद्याची मागणी वाढलेली असते. याची पूर्तता करताना उमेदवारांची दमछाक होत असते. यामुळेच अनेक इच्छुकांनी आचारसंहिता आणि अबकारी पोलिसांची दक्षता घेऊन गोवामेड मद्याची आयात केली आहे. 

गोवामेडचा तळीराम कार्यकर्त्यांना पुरवठा करण्यासाठी विशेष माणसे नेमली आहेत. विशिष्ट ठिकाणी मद्यसाठा करून ठेवला आहे. बेळगावात आलेल्या गोवामेडचा शोध घेण्याचे आव्हान अबकारी खात्यासमोर आहे.