Sat, Jun 06, 2020 20:27होमपेज › Belgaon › कर्नाटक विधानसभा : सर्वांचीच घराणेशाही...

कर्नाटक विधानसभा : सर्वांचीच घराणेशाही...

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 8:50PMबेळगावः प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेची  12 मे रोजी निवडणूक होणार आहे.  224 जागांसाठी एकाच टप्प्यात  मतदान होणार आहे. या निवडणुकीत विविध पक्षांनी कर्नाटकातील माजी मुख्यमंत्र्यांची  मुले आखाड्यात उतरवली आहेत. काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे.

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  सभेचे दि. 1 मे रोजी  चिकोडीत आयोजन करण्यात आले आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी कर्नाटकात दाखल झाले आहेत. कारवार, मंगळूर दौरा आटोपून ते कोडगू व म्हैसूर जिल्ह्यांत प्रचारसभामध्ये भाग घेणार आहेत.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सहा माजी मुख्यमंत्र्याची मुलं निवडणूक लढवत आहेत. देशातील राजकारणात घराणेशाही विषयी कितीही आरोप होत असले तरी वेगवेगळ्या पक्षांच्याकडून घराणेशाहीला खतपाणी घातल्याचे यातून दिसत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि त्यांची निवडणूक रिंगणात असलेली मुले डॉ. यतींद्र सिद्धरामय्या (काँग्रेस) : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचे हे सुपुत्र म्हैसूर जिल्ह्यातील वरुणमधून निवडणूक लढवत आहेत.

एच.डी रेवन्ना (जनता दल-सेक्युलर) : माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचा मोठा मुलगा हसन जिल्ह्यातील होळेेनरसीपुरामधून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे. एच. डी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) :  माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचाच दुसरा मुलगा जो रमननगर आणि चेन्नापट्टणा या दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत आहे. कुमार बंगारप्पा (भाजप) : कुमार  बंगारप्पा हा अभिनेता असून कर्नाटकचे  12 वे मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचा तो मुलगा. शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरब येथून तो लढत आहे.

महिमा पटेल (संयुक्त जनता दल) : माजी मुख्यमंत्री जे.एच. पटेल यांचे ते चिरंजीव असून दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरीमधून ते निवडणूक लढवत आहेत. अजय सिंह (काँग्रेस) : माजी मुख्यमंत्री असलेल्या धरमसिंह यांचे ते सुपुत्र असून कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी येथून निवडणूक लढवत आहेत. बसवराज बोम्मई (भाजप) : बसवराज हे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एस.आर बोम्मई यांचे चिरंजीव आहेत. ते हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथून निवडणूक लढवत आहेत.