होमपेज › Belgaon › निकालाआधीच सत्तेसाठी हालचाली गतिमान

निकालाआधीच सत्तेसाठी हालचाली गतिमान

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:40AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. 2636 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशीनबंद झाले असून मंगळवार दि. 15 रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निकालाआधीच सत्तेसाठी समीकरणे गतिमान झाली आहेत. जर हायकमांडने आदेश दिला तर दलित उमेदवारासाठी मुख्यमंत्री पद सोडायला तयार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. निजदला आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांनी असे विधान केले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावामुळे निजद काँग्रेसला पाठिंबा देणार नाही, असा अंदाज बांधत काँगे्रसने दलित मुख्यमंत्रीपदाचे कार्ड पुढे करत त्यांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.

यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे आपणच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. भाजपनेही मतदानाचा वाढलेला टक्‍का आपल्यालाच फायदेशीर ठरणार असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या समर्थनासाठी अधिकाधिक नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीनंतर विविध वृत्तवाहिन्या व वृत्तसंस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये राज्यामध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असा अंदाज व्यक्‍त केला आहे. त्यामुळे काँग्रेसने नरमाईची भूमिका घेत भविष्यातील रणनीती आखण्यासाठी योजना तयार केली आहे. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास निजदबरोबर युती करून सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते. मात्र सध्या तरी आपण 112 हा जादूई आकडा गाठणार असल्याचा विश्‍वास काँग्रेसकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. काँग्रेसच्या या रणनीतीवरून कोणत्याही परिस्थितीत राज्यात भाजपला सत्ता द्यायची नाही, असे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस निजदबाबत नरमाईची भूमिका घेत आहे.

सिद्धरामय्या यांच्या विधानानंतर निजदने सिद्धरामय्या मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार असतील तर काँगेसला पाठिंबा देण्याबाबतचे संकेत दिले आहेत. भाजपला पाठिंबा देण्याचा आमचा प्रश्‍नच येत नाही, असे पक्षाचे प्रवक्‍ते दानिश अली यांनी म्हटले आहे. सिद्धरामय्या यांच्या विधानाबाबत दुसरे प्रवक्‍ते तन्वीर अहमद यांनी असे झाले तर केवळ काँगेससाठी नाही तर राज्याच्या दृष्टीने चांगले होणार आहे. तसेच जनतेला संपूर्ण राज्याचा विकास करणारा चेहरा पाहिजे आहे, असे म्हटले आहे.