होमपेज › Belgaon › कर्नाटकात काँटे की टक्‍कर..!

कर्नाटकात काँटे की टक्‍कर..!

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:22AMबंगळूर : वृत्तसंस्था

कर्नाटक विधानसभा निवडणूक अगदी दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कर्नाटकची सत्ता कोण काबीज करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विविध सर्वेक्षणांची आकडेवारीही समोर आली असून, सर्वच सर्वेक्षणांमध्ये कल वेगवेगळा दिसत आहे. अशातच सट्टा बाजारानेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवला आहे.

सट्टा बाजाराचा अंदाज काय?

कर्नाटकात ‘काँटे की टक्‍कर’ होणार असून, कुणालाही बहुमत मिळणार नाही. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, तर त्यामागोमाग दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. जेडीएस तिसर्‍या क्रमांकावर राहून किंगमेकरची भूमिका निभावेल, असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवला जातो आहे.

कुणाला किती जागा मिळतील?

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, कर्नाटकात कुठलाच पक्ष स्वत:च्या हिमतीवर सरकार बनवू शकत नाही. भाजपला 92-94 जागांवर विजय मिळेल, काँग्रेसला 89-91 जागांवर विजय मिळेल, तर जेडीएसला 32-34 जागांवर विजय मिळेल. सट्टा बाजाराची अंदाजित आकडेवारी पाहता कुणीही एकहाती सत्ता मिळवू शकत नाही. कारण कर्नाटकच्या 224 जागांच्या विधानसभेत 113 जागा बहुमतासाठी आवश्यक ठरतात.

कर्नाटकात एकूण किती सट्टा?

सट्टा बाजारानुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत 200 कोटी रुपयांहून अधिक सट्टा लावण्यात आला आहे. मात्र, मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसे हे भाव वाढत जातील.
सट्टा कसा लावण्यात आला आहे?

एका बुकीच्या माहितीनुसार, सट्टा बाजाराचे हे आकडे सेशनचे आकडे आहेत. म्हणजे जर कुणी व्यक्‍ती भाजपच्या 92 जागा जिंकण्यावर एक लाख रुपये लावत असेल आणि भाजपने 92 जागा किंवा त्याहून कमी जागा जिंकल्या, तर पैसे लावणार्‍याला एक लाखाच्या जागी दोन लाख रुपये मिळतील. मात्र, जर भाजपने 93 किंवा त्याहून जास्त जागा जिंकल्या,  तर ती व्यक्‍ती पराभूत होईल.

तसेच, जर कुणी व्यक्‍ती भाजपच्या 94 जागा जिंकण्यावर एक लाख रुपये लावत असेल आणि भाजपने 94 किंवा त्याहून अधिक जागा जिंकल्या, तर पैसे लावणार्‍याला एका लाखाचे दोन लाख मिळतील. मात्र, भाजप पराभूत झाल्यास, ती व्यक्‍ती पराभूत होईल. असाच काँग्रेसवर सट्टा लावण्यात येत आहे.

कुठल्या पक्षाला किती भाव?

बुकींच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या 100 जागा जिंकण्याचा भाव 2.50 रुपये म्हणजे एक रुपया लावल्यास 2.50 रुपये मिळतील. मिशन-113 पार करण्याचा भाव 5.2 रुपये असेल. त्याचवेळी, काँग्रेसच्या 100 जागा जिंकण्याचा भाव 3.4 रुपये आणि बहुमताचा आकडा पार करण्यावर 6.1 रुपयांचा भाव आहे.

व्हीआयपी जागांवरही सट्टा

पक्षांच्या विजय-पराजयासोबतच व्हीआयपी जागांवरसुद्धा सट्टा लावला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चामुंडेश्‍वरीच्या जागेवर काँटे की टक्‍कर तर बदामीच्या जागेवर सिद्धरामय्या यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. चामुंडेश्‍वरीत सिद्धरामय्या यांच्या विजयाचा भाव 2.4 रुपये आहे, तर बदामीतील विजयाचा भाव 70 पैसे आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा यांच्या शिकारीपुराच्या जागेवर विजयाचा भाव 50 पैसे आहे, तर कुमारस्वामी यांच्या रामनगराच्या विजयाचा भाव एक रुपया आहे.

12 मे रोजी मतदान आणि 15 मे रोजी निकाल

12 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असून, 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. काँग्रेससाठी सत्ता राखण्याचे, तर भाजपसाठी सत्ता खेचून आणण्याचे आव्हान आहे. त्यात जेडीएसचे आव्हानही तगडे आहे. त्यामुळे कर्नाटकात कोण सत्तेच्या खुर्चीवर बसेल, याची उत्सुकता कर्नाटकसह देशभरातील जनतेला लागली आहे.