Mon, Mar 18, 2019 19:34होमपेज › Belgaon › मोदींच्या आधी विकास नव्हता?

मोदींच्या आधी विकास नव्हता?

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:31AMबंगळूर : प्रतिनिधी

नरेंद्र मोदी पंतप्रधान  बनण्याआधी देशाचा काहीच विकास झाला नव्हता का? बंगळूर शहराची ओळख भारताची सिलिकॉन व्हॅली अशी जगभर आहे. ती मोदी पंतप्रधान बनण्याआधीपासूनच आहे. मग मोदी कुठल्या विकासाची भाषा करतात, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच आधी कर्नाटकातून आणि त्यापाठोपाठ राजस्थान आणि मध्य प्रदेशातून भाजपला लोक भिरकावून टाकतील, असा दावा केला.

शिवाजीनगरात बुधवारी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मोदींच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.  मोदींनी रातोरात जादू करून बंगळूरची निर्मिती केलेली नाही. त्यांच्या विधानांमुळे कर्नाटकच्या निर्मितीत, विकासात महत्त्वाचे योगदान असणार्‍यांचा अपमान होतो. गेल्या सत्तर वर्षांत काहीच घडले नसल्यासारखे पंतप्रधानांच्या विधानावरून वाटत असल्याचा टोला राहुल गांधींनी लगावला.

बंगळूर शहर हे उद्यानांचे शहर आहे; पण मोदी बंगळूरला कचर्‍याचे शहर म्हणतात. हा बंगळूरचा आणि बंगळूरवासीयांचा अपमान आहे, असा आरोपही राहुल यांनी केला. कठुआ आणि उन्‍नाव अत्याचार प्रकरणांवर मोदींनी मौन बाळगल्याबद्दलही राहुल यांनी टीका केली. भाजपचे लोक समुदायांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, असेही ते म्हणाले.

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या यांच्यात तुलनाच  होऊ शकत नाही. एक जेलमध्ये जाऊन आलेत, तर दुसर्‍याचा कारभार पारदर्शक आहे. म्हणूनच लोक पुन्हा काँग्रेसला निवडतील, असा दावाही राहुल यांनी केला.