होमपेज › Belgaon › शुक्रवारपासून ‘आरोग्यभाग्य’

शुक्रवारपासून ‘आरोग्यभाग्य’

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 1:10AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील सुमारे दीड कोटी कुटुंबांसाठी लाभदायक ठरणार्‍या आरोग्य कर्नाटक योजनेला शुक्रवार 2 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. राज्य सरकारने जनतेच्या आरोग्यासाठी सदर योजना जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्ह्यांत सदर योजना लागू करण्यात येणार असून बेळगाव शहराचा समावेश दुसर्‍या टप्प्यात केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते 2 मार्च रोजी वसंत नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये योजनेचे उद्घाटन होईल. 

राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी ही योजना तयार केली आहे. योजनेची तयारी अंतिम टप्प्यात असून याचा लाभ अंगणवाडी, आर्थिक मागसवर्गीय, आदिवासी, अनुदानित शाळांमधील शिक्षक, असंघटित शिक्षक व ज्यांचे वार्षिक उत्पन्‍न 1.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना मोफत मिळणार आहे. तर उर्वरित नागरिकांनाही नाममात्र हप्ता देऊन योजनेचा लाभ मिळेल.

पहिल्या टप्प्यात सदर योजना राज्यातील दहा इस्पितळांसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती राज्यभर करण्यात येणार असून बेळगावचा समावेश दुसर्‍या टप्प्यात होणार आहे. कर्नाटक आरोग्य योजना यशस्विनी योजनेपेक्षा फायदेशीर आहे. यशस्विनी योजनेत 823 शस्त्रक्रियांचा समावेश होता. तर या योजनेत 1500 हून अधिक शस्त्रक्रियांचा समावेश आहे. यशस्विनी योजनेसाठी कमी दर आकारला जातो. परंतु, आरोग्य कर्नाटक योजना पूर्णपणे मोफत राहणार आहे. त्याचबरोबर एका कुटुंबातील पाच सदस्यांना याचा लाभ घेणे शक्य होणार आहे.