Mon, Jun 24, 2019 16:34होमपेज › Belgaon › भुताटकी झाली बया भुताटकी झाली....

भुताटकी झाली बया भुताटकी झाली....

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:11PMभुताटकी झाली बया भुताटकी झाली.....याचा प्रत्यय आल्यानं आप्पा आपल्या निवासस्थानी एका कक्षात केवळ छोटा दिवा लावून हात चोळत बसले होते. आपण तर राज्यातील बहुतेक मठ, मंदिरांत जाऊन प्रार्थना केल्या, नवस बोलले. प्रसाद वाटला. काही प्रसंगी पुजार्‍याकरवी विशेष पूजा करवल्या. यज्ञ...होम सारं सारं केलं, पण असं का व्हावं? हाती आलं पण नियतीनं म्हणा किंवा विरोधकांनी तोंडात आलेला घास हिसकावून नेला. काय बरं झालं असेल? अशा चिंतेत आप्पा इकडून तिकडं झपाझप येरझार्‍या घालत होते. डोक्याला हात धरून बराच वेळ विचारमुद्रेत बसले, पण काही केल्या मनाला चैन पडेना. काय करावं? सत्ता समोर दिसते आहे, पण तिथपर्यंत पोहोचता येत नाही, याला काय म्हणावं? दुर्दैव की आपलं नशीब? आशेचा किरण दिसत कसा नाही? असं काही व्हावं की सत्तासोपान सुलभ व्हावा. आपण मागं काय चुका केल्या, कोणाला दुखावलं, आपल्या हातून अप्रिय कृत्य तर घडलेलं नाही ना......असे नाना विचार मनात चमकून जात होते. पण ऐन गरमीत थंडावा काही मिळत नव्हता. 

इतक्यात एक बातमी थडकली. समोरचा खणाणणारा फोन आप्पांनी लगबगीनं घेतला. पलीकडची व्यक्‍ती बोलत होती, ‘आप्पा मागच्या निवडणुका आठव. त्यावेळी तू ‘ऑपरेशन कमळ’ मोहीम राबवली होतीस. आताही तुला अशीच शेवटची संधी आहे. बघ विचार कर.’ पलीकडच्या व्यक्‍तीनं फोन बंद केला.

आप्पा विचारात पडले. ती व्यक्‍ती कोण, आवाज मुळीच ओळखीचा वाटत नाही. शिवाय ती बोलत असताना एक प्रकारचा ओम ओमचा हलका ध्वनी ऐकू येत होता. आप्पांना काही चैन पडेना. इतक्यात पुन्हा फोन वाजला. आप्पांनी उचलला. पुन्हा तोच आवाज. ‘आता विचार करायला तुला वेळ नाही. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. ही संधी गेली तर मला दोष द्यायचा नाही.’

आप्पांची घालमेल सुरू झाली. त्यांनी ऑपरेशन कमळबाबत थेट दिल्‍लीश्वरांचा सल्‍ला घ्यायचा ठरवून त्यांना मोबाईल केला. पण उचलला गेला नाही. असं तीन वेळा घडलं. पण आप्पांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी चौथ्यांना संपर्क साधला. दिल्‍लीश्वरांचा आवाज ऐकून आप्पांना धीर आला. त्यांनी दबक्या आवाजात विचारलं, ‘साहेब, ऑपरेशन कमळ पुन्हा....’

यावर पलीकडून आवाज अचानक बंद झाला. आप्पांनी फोन ठेवला. पुन्हा फोन वाजला...आप्पांनी उचलला, परत पहिल्या व्यक्‍तीचाच आवाज...‘ही गोष्ट कुणाला न सांगता करायची आहे. फार तर बादशहाचा सल्‍ला घे. पण निर्णय तूच झटपट घे. नाही तर....’

आप्पांना त्या अंधुकशा प्रकाशात आशेचा किरण दिसला. ऑपरेशन कमळसारखीच अन्य शक्‍कल लढवण्याच्या तयारीसाठी म्हणून ते कक्षातून बाहेर पडले आणि शुभश्च शीघ्रम...कामाला लागले....