Mon, Aug 19, 2019 13:20होमपेज › Belgaon › पोलिस खात्यालाही उत्सुकता निकालाची

पोलिस खात्यालाही उत्सुकता निकालाची

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:51AMबेळगाव : प्रतिनिधी 

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांनाही निवडणुकीची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार यावर पोलिस कर्मचार्‍यांकडून चर्चेला उधाण आले आहे. 

शासकीय कर्मचार्‍यांना नेहमीच सत्तेवर कोणते सरकार येणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. सत्तेत येणार्‍या सरकारांकडून यापूर्वीच्या असणार्‍या सत्ताधार्‍यांकडून देण्यात आलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का? याबद्दल नेहमीच चर्चा केली जाते. त्यानुसार पोलिस खात्यातील अधिकार्‍यांकडून राजकीय पक्षांच्या निर्णयाबद्दल व आश्‍वासनांबद्दलही चर्चा रंगली आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच पोलिस कर्मचार्‍यांमध्ये निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांकडून वेगवेगळ्या भागातील राजकीय वातावरण कार्यकर्त्यांची मते यावर खमंग चर्चा रंगताना दिसत आहे. 

वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तीसाठी असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांकडून त्या-त्या भागातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे राजकीय प्राबल्य मतदारांची मते कार्यकर्त्यांचा उत्साह यावरून राजकीय अंदाज बांधण्यात येत आहेत.

काही पोलिस कर्मचार्‍यांकडून राज्यात भाजप सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर काहीजणांकडून त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर काही जणांकडून पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचा ठाम विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. तर काही जणांकडून या दोन्ही पक्षांमध्ये निजद किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा केली जात आहे. यामुळे पोलिस कर्मचार्‍यांनाही निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागून राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.