Thu, Jul 18, 2019 06:51होमपेज › Belgaon › मामा-भाच्यात वर्चस्वाचे रंगलेय धुमशान

मामा-भाच्यात वर्चस्वाचे रंगलेय धुमशान

Published On: May 03 2018 12:15AM | Last Updated: May 03 2018 12:14AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारीवरून कित्तूर विधानसभा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मामाला थेट भाच्याने उमेदवारी मिळविण्यावरून आव्हान दिल्यानेे लढत रंगतदार झाली आहे.  आ. डी. बी. पाटील यांना त्यांच्या घरातूनच कडवे आव्हान मिळाले असून याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न अन्य उमेदवाराकडून होणार आहे. राणी चन्नम्मा यांच्या संस्थानामुळे मतदारसंघाची ओळख राज्यात निर्माण झाली आहे. अशा ऐतिहासिक मतदारसंघात आमदारकीसाठी चुरसीची लढत होत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेमध्ये असणारा मतदारसंघ म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. 

आ. डी. बी. पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी सुरुवातीपासून चालढकल करत होते. यामुळे वैतागलेल्या इनामदार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. तर उमेदवारीसाठी त्यांचे भाचे बाबासाहेब पाटील यांनीदेखील काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला होता. अखेरच्या टप्प्यात बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी नाकारून इनामदार यांना उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली. यामुळे बाबासाहेब पाटील यांनी अधिकृत उमेदवार असणार्‍या मामाविरोधात शड्डू ठोकला आहे. 

भाजपने माजी आ. सुरेश मारिहाळ यांना तर निजदने माजी जि. पं. सदस्य महांतेश दोडगौरड यांना उमेदवारी दिली आहे. या चार उमेदवारामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. आ. इनामदार यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. दोघांच्या भांडणात भाजपचा लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. परिणमी बड्या नेत्यांच्या सभा घेऊ न मतदारसंघात काँग्रेसविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  निजदचीही ताकत याठिकाणी बर्‍यापैकी आहे. कुमारस्वामी यांनीही याठिकाणी लक्ष केंद्रित केले असून ही जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निजदच्या स्टार प्रचारकांच्या उपस्थितीत याठिकाणी सभा घेण्यात येणार आहे.

कित्तूर मतदारसंघाने सातत्याने काँग्रेसला साथ दिली आहे. याठिकाणी मध्यंतरी भाजपचे सुरेश मारिहाळ यांनी इनामदार यांचा पराभव केला होता. त्यानंतर इनामदार यांनी पुन्हा याठिकाणी आपले वर्चस्व निर्माण करून भाजपकडून ही जागा खेचून आणली होती. मात्र यावेळी मामा-भाच्यामध्ये रंगलेल्या संघर्षामुळे ही जागा गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंडखोर उमेदवार बाबासाहेब पाटील हे जि. पं. सदस्य म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची पत्नी जि. पं. सदस्या आहेत. त्यांचा या परिसरात चांगला संपर्क आहे. कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याजवळ आहे. त्याजोरावर त्यांनी मामाला आव्हान देण्याचे धाडस केले आहे. मतदारसंघात इनामदार यांच्या विषयी काही प्रमाणात नाराजी आहे. त्याचाही फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूणच इनामदार यांची याठिकाणी कसोटी लागणार आहे. 

Tags : Karnataka Election, Kittur Election, Fight Two Candidates