Sun, Apr 21, 2019 02:34होमपेज › Belgaon › 2636 उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये सीलबंद

2636 उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये सीलबंद

Published On: May 13 2018 2:12AM | Last Updated: May 12 2018 11:21PMबंगळूरः प्रतिनिधी

संपूर्ण  देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. 224 पैकी 222 मतदारसंघात तब्बल 2636 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपची पणाला लागलेली  प्रतिष्ठा, सलग सत्ता राखण्याचे काँग्रेससमोर असलेले आव्हान आणि आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निजदने टाकलेले फासे यांचा सोक्षमोक्ष मंगळवारी 15 रोजी लागणार आहे.

 दोन मतदारसंघांमधील निवडणूक पुढे ढकलली आहे. दरम्यान 4.90 कोटी  एकूण मतदार आहेत. यावेळी 72 लाख नवीन  मतदारांची नोंदणी झाली असून यातील 3 टक्के म्हणजे 15.42 लाख मतदार हे 18 ते 19 वयोगटातील आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरुणामध्ये मतदान केले. बेळगावच्या एका मतदान केंद्राबाहेर मुस्लिम महिलेला रोखण्यात आले. वास्तविक, महिला बुरख्यात आली होती आणि ओळख पटवण्यासाठी बुरखा काढायला सांगण्यात आले. यानंतर महिला अधिकार्‍याने केबिनमध्ये त्यांची ओळख पटवली.

सिद्धरामय्या परंपरा खंडित करणार का?
सिद्धरामय्या यांच्यासमोर मागच्या  33 वर्षांपासून सुरु असलेली एक परंपरा खंडित करण्याचे आव्हान आहे. कर्नाटकात  1985 सालापासून कुठल्याही एका पक्षाला सलग दोन वेळा सत्ता मिळवता आलेली नाही. रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखाली फक्त जनता दलाला कर्नाटकात सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळवता आली होती.  सालापासून कर्नाटकात तेरा मुख्यमंत्री झाले आहेत. कर्नाटकातील जनतेने नेहमीच आलटून पालटून कौल दिला आहे. कर्नाटकातील हीच परंपरा बदलण्याचे सिद्धरामय्या यांच्यासमोर आव्हान आहे

 
ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेे यांनी कलबुर्गीच्या बसवानगरच्या बूथ नंबर 108 मध्ये मतदान केले.

सिद्धगंगा मठाचे प्रमुख 111 वर्षीय श्री शिवकुमार स्वामी यांनी तुमकुरमध्ये आपल्या अनुयायांसोबत मतदान केले.

एच. डी. कुमारस्वामी यांनी पत्नी अनितासोबत रामनगरमध्ये मतदान केले. - श्री श्री रविशंकर यांनीही कनकपुरा पोलिंग बूथवर मतदान केले.

म्हैसूरच्या शाही परिवाराचे कृष्णदत्त वोडियार यांनी म्हैसूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी हासन जिल्ह्यातील होलेनरसिपुराच्या बूथ नंबर 224 मध्ये मतदान केले.

मतदानापूर्वी बदामीमधील भाजप उमेदवार बी. श्रीरामुलू यांनी गायीची पुजा केली. 

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सदानंद गौडा यांनी पुत्तूरमध्ये मतदान केले. यावेळी मताची टक्केवारी वाढेल. लोकांना सिद्धरमैय्या यांना सत्तेबाहेर करण्याची इच्छा आहे. लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर निघतील असेही ते म्हणाले. 

भाजपचे मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार बी.एस. येडियुराप्पा यांनी शिमोगा येथील शिकारीपुरमध्ये मतदान केले. 

निवडणुकीच्या रिंगणात एकूण 2636 उमेदवार उतरले आहेत. यातील 391 (15%) उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत, तर 883 (35%) उमेदवार हे कोट्याधीश आहेत. सर्वात जास्त संपत्ती काँग्रेसचे प्रियकृष्ण (1020 कोटी रूपये) यांची आहे, तर सर्वात कमी संपत्ती अपक्ष  उमेदवार दिलीप कुमार (1 हजार रुपये) यांची आहे. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामय्या आणि एच. डी. कुमारस्वामी 2-2 मतदारसंघातून तर येडियुराप्पा एका मतदारसंघातून आपआपले नशिब आजमावत आहेत.