Thu, Jul 18, 2019 06:53होमपेज › Belgaon › परि श्रेष्ठ जाणा माणुसकी...

परि श्रेष्ठ जाणा माणुसकी...

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 8:31PM- सुनील आपटे

मतदार राजा असला तरी देवाकडे उमेदवार, नेते यांची याचना करण्याची प्रथा पारंपरिक आहे. आपले भवितव्य मतदार ठरवतात, हे माहीत असूनही ते देवाचा धावा करतात. ते मग देवाला मानणारे असोत की स्वत:ला निधर्मी समजणारे. सारेच आपले ईप्सित साध्य होण्यासाठी लोटांगण घालतात, देवस्थानांना भरीव देणग्या देत असतात.

बादशहा आणि युवराज यांनीही देवाला शरण जायचे ठरवले. त्यांनी मन मोकळे केले.

देवाचिये व्दारी
आले बध्द करी
बादशहा पुढे
युवराज मागुती

ते म्हणतात....
अमुची एक अर्जी
असो द्यावी मर्जी
नच स्वार्थ मनी

जाणावे अंतरी...
 
बादशहा म्हणे...
देवा श्री हरी
कर्नाटक पदरी
द्यावा सत्वरी
बोललो नवस
मागणे आणिक
नाही काही...

युवराज म्हणतात..
जोडोनिया हात
म्हणती युवराज
असो द्यावे ‘राज’
लाडक्या सिध्दय्यांचे
रणी फडकती
बहुत झेंडे तरी
हात घ्यावा ‘हाती’...

लगेच बादशहा म्हणाले...
विनवती बादशहा
व्दारी आलो पाहा
करा कृपा दयाळा
मला तुझा लळा
धूप, दीप, बुक्‍का
आलो घेऊन तुजला
दिल्‍लीहुनी कमळा...
....................
टाळ युवराजा हाती
नारळ फट् फोडती
शकले दोन होती
एक त्यातले अर्पिती
दाखवला नैवेद्य
तूप-दही-दूध
द्या मजला प्रसाद

.......................
बादशहा म्हणे बा विठ्ठला
दिवस-रात्र आम्ही केला एक
उमेदवार दिधले योग्य अनेक
सुशासनाच्या घेतल्या शपथा
हाकेन राज्यशकट सुपथा
वरदान मजला द्यावे आता
पुढील वर्षी केंद्रा कमल-सत्ता...
..........................

जोडोनिया पाणि, करिती नमन
युवराजा नेत्री, तरळले पाणी
मागतो हा दीन, जावे बुरे दिन
कर्नाटक-दिल्‍ली द्यावी आंदण
जावा कौल हाता, दाबाता बटण
साडेसाती पाठवा शत्रू-घरा
सर्वत्र येऊ दे ‘पंजा’च प्यारा...

दोघांनीही आपापले मागणे मागितले. पण एवढ्यात नारदांची स्वारी तेथे आली. त्यांनी दोघांनाही सांगितले, बाळांनो आता आपण एकत्र जनहिताचे मागावे. याने देव प्रसन्‍न होईल.
बादशहा आणि युवराजांना ते पटले. दोघेही म्हणाले...
शंभर टक्के व्हावे मतदान
लोकशाही स्तंभ होईल भक्‍कम
कुणाचीही येवो राज्यसत्ता
सुखी व्हावी जनता तव कृपे
देशावरची जाळी सर्व आपदा
याचक आम्ही दोघे, द्यावे प्रसादा...

यावर देव प्रसन्‍न होतो आणि म्हणतो...

भांडण, झगडा मानवी स्वभाव
अंतरी असू द्या सेवाभाव
नाही कोणी राजा-रंक आणि राव
प्रभूपाशी नसतो भेदभाव
जो तो भोगतो फळे कर्माची
सत्कर्म धर्म, दुष्कर्म अधर्म
परि श्रेष्ठ जाणा माणुसकी...

देवाचा हा उपदेश ऐकून दोघेही काही काळ स्तब्ध होतात...