Fri, Apr 26, 2019 01:53होमपेज › Belgaon › कणबर्गी सिद्धेश्‍वर मंदिर ग्रामस्थांचेच

कणबर्गी सिद्धेश्‍वर मंदिर ग्रामस्थांचेच

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:51PMबेळगाव : प्रतिनिधी

कणबर्गी येथील सुप्रसिद्ध सिद्धेश्‍वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या वनखात्याला चपराक बसली असून जागृत आणि प्राचीन असलेले मंदिर ग्रामस्थांचे आहे, हे सिद्ध झाले आहे.  26 सप्टेंबर 2016 मध्ये सिद्धेश्‍वर मंदिर ग्रामस्थांचे असल्याचे सात-बारा उतार्‍यावरून सिद्ध झाले आहे. 

गावच्या उतार्‍यामध्ये कणबर्गी येथील सिद्धेश्‍वर मंदिर हे सर्व्हे क्रमांक 1 नमूद करण्यात आले असून तसा उताराही ग्रामस्थांकडे उपलब्ध आहे. केवळ राजकीय द्वेषभावनेतून मंदिराच्या जीर्णोद्धाराला अडथळा करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कणबर्गी येथील सिद्धेश्‍वर मंदिराला जवळपास 300 वषार्ंचा इतिहास आहे. येथील मंदिराच्या पुजार्‍याला राज्य सरकारकडून मानधन देण्यात येते. असे असताना जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा आणणे चुकीचे आहे. गेल्या वर्षांपासून हे काम सुरू असताना आताच हस्तक्षेप का करण्यात येत आहे आणि वनखात्याला याबाबतचा अधिकार कोण दिला, असा प्रश्‍न या भागातील ग्रामस्थ आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी उपस्थित केला आहे.

तहसीलदारांनी आदेश क्र. 76/16-17 नुसार या मंदिराचे पुजारी मारुती रेवण्णा पुजारी रा. कुंभार गल्ली कणबर्गी यांनी केलेल्या मागणीनुसार सदर मंदिर हे कणबर्गी गावचे देवस्थान असून त्यामध्ये वनखात्याचा कोणताही उल्लेख नसून तसे पत्र दिले आहे.  त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या मंदिराच्या विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. 

दरम्यान, कणबर्गी गाव हे महानगरपालिकेच्या व्याप्तीत येत असून  1995 पासून या मंदिर परिसरात विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. दोन कूपनलिकांची खोदाई, बगीचा, रस्ता, भाविकांसाठी शेड आणि आसन व्यवस्था माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी अडथळा आणण्यात आला नाही. आता मात्र राजकीय द्वेशातून जीर्णोद्धाराला अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र, तहसीलदारांनी दिलेला आदेश व कागदपत्रानुसार हे मंदिर हे ग्रामस्थांचे आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

URL :