Sat, Mar 23, 2019 12:17होमपेज › Belgaon › कलेचे मंदिर की भंगार अड्डा?

कलेचे मंदिर की भंगार अड्डा?

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 10:40PMबेळगाव : प्रतिनिधी

टिळकवाडीमधील मनपाचे ‘कलामंदिर’ म्हणजे ‘भंगारमंदिर’ बनल्याची टीका गुरुवारी झालेल्या मनपा लेखा स्थायी समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली. अध्यक्षस्थानी लेखा समितीच्या अध्यक्षा सरला हेरेकर होत्या.

कलामंदिरच्या आवारामध्ये मनपाची स्क्रॅप वाहने व चोहोबाजूला कचरा साठलेला आहे. गेल्या 25 वर्षांपासून नादुरुस्त रोडरोलर आहे. कलामंदिरची देखभाल कोणत्या विभागाकडून केली जाते, त्याचे बुकिंग कोणाकडे करावयचे, भाड्याचे दर ठरलेले आहेत का, भाडे आतापर्यंत किती जमले, अशा अनेक प्रश्‍नांचा भडीमार यावेळी करण्यात आला. या प्रश्‍नांना उपस्थित एकाही अधिकार्‍याने समर्पक उत्तर दिले नाही. केवळ एका महिन्याचे 9 हजार रुपये भाडे मिळाल्याचे महसूल अधिकारी पी. एम. पाटील यांनी सांगितले. कलामंदिरच्या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्याचा वापर करण्यासाठी लोक येत नसल्याचे केसवर्करने सांगितले. यावर सदस्यांनी हरकत घेऊन तेथील समस्यांबद्दल तुम्ही महसूल अधिकारी किंवा आयुक्‍तांना अहवाल दिला का, असा प्रश्‍न केला. यावेळी केसवर्कर काही बोलू शकली नाही. 

आवारामध्ये मनपाची स्क्रॅप वाहने आहेत. त्यांचा लिलाव केला का, अशी विचारणा सदस्यांनी केली. मनपाच्या एका कर्मचार्‍याने तेथील दहा वाहनांची निविदा काढून लिलावाने विक्री करण्यात आल्याचे सांगितले.  त्या वाहनांचा लिलाव 7 लाख 20 हजार रुपयांना हुबळीमधील एकाने घेतल्याचे सांगितले. 

लेखा अधिकार्‍यावर हल्‍लाबोल 

शहरातील भूभाडेसंदर्भात मनपाला 4 लाख 79 हजार रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती लेखा अधिकारी रामाप्पा हट्टी यांनी दिली. त्यांच्या या निवेदनावर सदस्यांनी हल्लाबोल केला. भूभाडे वसुलीसंदर्भात कर्मचार्‍यांकडूनच मोठ्या गळत्या असल्याचा आरोप केला. भूभाडे रोज 20, 50 व 100 रुपयांप्रमाणे वसूल केले जाते. केवळ मनपाकडे तितकी रक्‍कम जमा झाली ही शरमेची बाब असल्याचे सदस्यांनी म्हटले.

रामदेव हॉटेलकडे लक्झरी बसेस मनपा जागेवर थांबविण्यात येतात. याबद्दल मनपाला केवळ रोज 100 रुपये भाडे दिले जाते. तेथील एकच हॉटेल मालक एका लक्झरी गाडीकडून दररोज 500 रुपयेप्रमाणे वसूल करतो. यावरून महसुलामध्ये किती गळत्या आहेत याची कल्पना येते. महसूल व आरोग्य विभागातील त्या थांबवायच्या असतील तर स्टाफ बदलण्याची मागणी सदस्यांनी केली. 

बैठकीला गैरहजर अधिकार्‍यांना नोटिसा बजावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्षा हेरेकर यांनी केली. अधिकारीच उपस्थित राहत नसतील तर आम्ही कुणाला माहिती विचारायची ? नागरिक विविध कराद्वारे पैसे देतात. त्याचा हिशेब देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे हेरेकर म्हणाल्या. बैठकीला महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी,  पुष्पा पर्वतराव, आरोग्याधिकारी शशिधर नाडगौडा, परिषद सचिव लक्ष्मी निपाणीकर, कायदा अधिकारी उमेश महंतशेट्टी व इतर अधिकारी उपस्थित होते.