Sat, Jul 20, 2019 21:22होमपेज › Belgaon › सरकारी योजनांची जागृती करणारे वाहन पलटी ; तरुणी ठार

सरकारी योजनांची जागृती करणारे वाहन पलटी ; तरुणी ठार

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 1:15AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची गावोगावी जाऊन पथनाट्याद्वारे जागृती करणार्‍या कलाकारांच्या टेंपोला काकती येथे अपघात होऊन यामध्ये कलापथकातील एक तरुणी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. 

कस्तुरी लक्ष्मण चिक्कमण्णावर (वय 26, रा. निलगुंदी, जिल्हा गदग) असे मृत तरुणीचे नाव आहे. यामध्ये महांतेश हणमंत दोडमनी (वय 18, रा. गदग), भरत दुर्गाप्पा मॅगेरी (वय 20, रा. सवद, जि. गदग), यल्लाप्पा गुंगीनाळ (वय 19, रा. सोनट्टी, ता. बेळगाव), आलूवासा प्रशांत (वय 35, रा. गदग) यांच्यासह आणखी काहीजण यामध्ये जखमी झाले आहेत. घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली आहे. स्वच्छता अभियानासंदर्भात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यासाठी सदर पथक तालुक्यातील सोनट्टी येथे गेले होते.

कार्यक्रम संपवून टेंपोतून परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यावरून येणार्‍या दुचाकीस्वारालाही ठोकर दिली. यामध्ये तो जखमी झाला. तर राष्ट्रीय महामार्गावरील एका घराला धडक दिली. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेली युवती टेंपोतून बाहेर फेकली गेली. त्यात ती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली तर अनेकजण गंभीर  जखमी झाले आहेत. घटनास्थळी काकती पोलिसांनी धाव घेऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. काकती पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.